माजी विद्यार्थी स्नेहमेळावा : शाळेच्या आठवणींनी भरून आलेले डोळे, वृक्षारोपणातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

0
690

कोतोली । प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

जनता शिक्षण संस्था, कोतोली संचलित नेहरू विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कोतोली येथील सन २००१–०२ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अतिशय भावनिक वातावरणात उत्साहात पार पडला. काळाच्या ओघात देश–विदेशात विविध क्षेत्रांत स्थिरावलेले विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या अंगणात एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.“माजी विद्यार्थी हीच शाळेची खरी संपत्ती आहे,” असे भावनिक उद्गार शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक सुरेश लोहार यांनी अध्यक्षीय भाषणात काढले. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांकडे पाहताना शिक्षकांचे मन अभिमानाने भरून आल्याचे त्यांनी सांगितले.स्नेहमेळाव्याची सुरुवात तत्कालीन शिक्षकांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाने करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ शब्दांत न ठेवता, बॅचच्या वतीने शाळा परिसरात देशी झाडांची लागवड करून माजी विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक बांधिलकी प्रत्यक्ष कृतीतून जपली.“विद्यार्थ्यांनी जोपासलेली ही सामाजिक जाणीवच शाळेच्या संस्कारांची खरी पावती आहे,” असे लोहार सर यांनी यावेळी नमूद केले.विद्यार्थ्यांनी मनोगतातून शाळेबद्दलची आपुलकी व्यक्त केली. “आज आम्ही ज्या यशाच्या शिखरावर पोहोचलो आहोत, त्यामागे आमच्या शाळेचा आणि शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे,” अशी भावना अनेकांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी व्यक्त केली.

शिक्षकांनीही गुणवंत, यशवंत व कीर्तीवंत विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकी पेशा सार्थ झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक निवृत्ती बंके, वाय. के. पाटील, पी. एस. पोर्लेकर, एस. डी. पाटील, सौ. मांजरेकर मॅडम, एम. जे. पाटील मॅडम यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचेप्रस्ताविक – संदेश भोपळे,सूत्रसंचालन – उत्तम पाटील,मनोगत – सागर मांजरेकर, संदीप पोवार, धनाजी पोवार, तृप्ती कळंत्रे, दिपाली गुरवआभार – रविराज कांडरयशस्वी आयोजनासाठी भरत चौगुले, सुदर्शन पाटील, तानाजी लव्हटे, विनायक गांजवे यांनी सहकार्य केले.हा स्नेहमेळावा केवळ पुनर्मिलन न ठरता, आठवणी, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी यांचा भावनिक संगम ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here