
प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व वैचारिक चळवळीचा मजबूत आधारस्तंभ असलेले ज्येष्ठ विचारवंत, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भाई डॉ. एन. डी. पाटील यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.सत्य, शोषणविरोधी लढा, शेतकरी-कामगारांच्या हक्कांसाठी अखंड संघर्ष आणि निर्भीड विचारांची परंपरा जपणारे नेतृत्व म्हणून भाई डॉ. एन. डी. पाटील यांचे कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्या स्मृतीस उजाळा देताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या संघर्षमय जीवनकार्याचा गौरव केला.यावेळी प्रशांत पाटील, संगीता पाटील, एम. डी. पाटील, अरुण पाटील, जितेंद्र भोई, संतोष टोणे, विकास चौगुले यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाई डॉ. एन. डी. पाटील यांनी शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांना सभागृहात आणि रस्त्यावर प्रभावीपणे मांडत अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांची वैचारिक संपदा, निर्भीड भूमिका व साधे जीवनमान हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.कार्यक्रम शांत, सुसंस्कृत आणि भावनिक वातावरणात पार पडला. उपस्थित सर्वांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

