
कोल्हापूर : प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात तिकीट मागण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची अक्षरशः तोबा गर्दी उसळली. सकाळपासूनच उमेदवारांच्या मुलाखतींना प्रारंभ झाल्याने काँग्रेस भवन राजकीय हालचालींनी गजबजून गेले होते.
या दरम्यान पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे संपूर्ण कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडाली. “कोल्हापूर महानगरपालिकेत जर शिवसेना (शिंदे गट) एकत्र येण्यास तयार असेल, तर त्याबाबत निश्चितपणे विचार केला जाऊ शकतो,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केल्याने महानगरपालिकेच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.महापौर पदावरून बोलताना सतेज पाटील यांनी सध्याच्या पद्धतीवरही घणाघाती टीका केली. “हिम्मत असेल तर महापौर पद अडीच वर्षे एकाच व्यक्तीला द्यावे. एक वर्षाचा महापौर केल्यावर दोन महिने सत्कारात, दोन महिने राजीनामा मागण्यात जातात. उरलेले आठ महिने सुट्ट्या धरल्या तर प्रत्यक्ष कामासाठी फारच कमी कालावधी मिळतो,” असे परखड मत त्यांनी मांडले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, “जे मित्रपक्ष सोबत येतील, त्यांना सर्वांना बरोबर घेऊन शक्य तिथे युती केली जाईल. राजू शेट्टी, गणपतराव पाटील तसेच वंचित आघाडीला सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्याचा आमचा निर्धार आहे.”

यावेळी त्यांच्या समवेत आमदार जयंत आसगावकर, उदयांदेवी साळुंखे, गोकुळचे संचालक चौगुले, युथ बँकेचे चेतन नरके, नवनिर्वाचित नगरसेवक राजेश लाटकर यांच्यासह मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक उपस्थित होते. या गर्दीमुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय अक्षरशः फुलून गेले होते.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटलांच्या या वक्तव्यामुळे कोल्हापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

