
विवेकानंद महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर पाडळी बुद्रुक येथे सुरू
कोल्हापूर प्रतिनिधी: पांडुरंग फिरिंगे
येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे विशेष श्रमसंस्कार शिबीर पाडळी बुद्रुक (ता. करवीर) येथे उत्साहात सुरू झाले आहे. हे शिबीर २३ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार आहे. शिबिराचे उद्घाटन डॉ. टी. एम. चौगले, संचालक राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. चौगले म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांना समाजातील समस्या व गरजा समजून घेण्याची संधी मिळते. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, स्वावलंबन तसेच सामाजिक बांधिलकी विकसित होते.
या विशेष शिबिरात ग्रामस्वच्छता, आरोग्य शिबीर, वृक्षसंवर्धन, एड्स जनजागृती, जलसाक्षरता, महिला सबलीकरण, पर्यावरण जागृती, सांडपाणी व्यवस्थापन तसेच प्रदूषणविषयक जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शिबिराच्या कालावधीत विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली असून जलसंधारण व शाश्वत विकासामध्ये युवकांचा सहभाग या ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने शिबीर राबविण्यात येत आहे.
यावेळी पाडळी बुद्रुक गावचे सरपंच श्री. शिवाजी गायकवाड यांनी एन.एस.एस. स्वयंसेवकांनी गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेविषयी तसेच मोबाईलच्या अतिवापराबाबत जनजागृती करावी, असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शारीरिक श्रमांसोबत अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यावर भर दिला. समाजमाध्यमांचा वापर जाणीवपूर्वक करावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप पाटील, कार्यक्रमाधिकारी (राष्ट्रीय सेवा योजना) यांनी केले. यावेळी उपसरपंच श्री. धनाजी पाटील, संदीप पाटील, अरुणा पाटील व राजू पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन श्री. हेमंत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राजश्री पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील डॉ. पी. आर. बागडे, डॉ. बी. टी. दांगट, सौ. एम. के. पोवार, सौ. एल. आर. कुटिन्हो, शिक्षक, कार्यक्रम अधिकारी व एन.एस.एस. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

