
प्रतिनिधी : रोहित डवरी
कुंभोज जिल्हा मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पंचायत समिती सदस्य सौ. ऐश्वर्या अजय पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ही उमेदवारी निश्चित करण्यात आली असून, त्यामुळे कुंभोज परिसरातील राजकीय वातावरणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

सौ. ऐश्वर्या अजय पाटील या हातकलंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय पाटील यांच्या पत्नी असून, पाटील कुटुंबाला राजकारण, समाजकारण आणि सहकार क्षेत्रात तब्बल २६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. अजय पाटील यांनी या काळात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सहकारी संस्थांमधून उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्याचा फायदा सौ. ऐश्वर्या पाटील यांच्या उमेदवारीला निश्चितच होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

सौ. ऐश्वर्या अजय पाटील या सध्या पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत असून, त्यांनी महिलांचे प्रश्न, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत विषयांवर सक्रियपणे काम केले आहे. त्यांची जनसंपर्कातील पकड, कार्यकर्त्यांशी असलेला संवाद आणि सामान्य जनतेशी असलेली जवळीक यामुळे त्या मतदारसंघात लोकप्रिय ठरत आहेत.
या निवडणुकीत सौ. ऐश्वर्या अजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ चिन्ह) या पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरणार असून, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर विजयासाठी सज्ज झाल्या आहेत.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुंभोज व परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अनेक ठिकाणी अभिनंदन व समर्थनाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. येणाऱ्या काळात प्रचाराला वेग येणार असून, ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


