
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कोतोली पंचायत समिती मतदारसंघासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे आण्णासाहेब बाळकू गायकवाड यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. मोजक्या पण निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साध्या पण ठाम वातावरणात हा अर्ज दाखल करण्यात आला.
माळवाडी (ता. पन्हाळा) येथील पतसंस्था यशस्वीपणे चालवून गावाच्या विकासाची गंगा उभारणारे नेतृत्व म्हणून आण्णासाहेब गायकवाड यांची ओळख आहे. आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांना न्याय देणारी कार्यपद्धती या जोरावर त्यांनी माळवाडी गावाचा चेहरा-मोहरा बदलला. “जे माळवाडीत केलं, तेच संपूर्ण कोतोली मतदारसंघात” या विकासाच्या धर्तीवर ते आता थेट निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
ग्रामीण भागातील प्रश्नांची सखोल जाण, सहकार क्षेत्रातील अनुभव आणि लोकविश्वासाची शिदोरी घेऊन गायकवाड यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे कोतोली पंचायत समिती मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आगामी निवडणूक ही विकास विरुद्ध केवळ राजकारण अशी ठरणार असून, आण्णासाहेब गायकवाड यांच्या उमेदवारीकडे मतदारांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

