
पाचगाव | प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे
पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी लोकायुक्त सरपंच संग्राम पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. यावेळी सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच दिपाली गाडगीळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संग्राम पाटील यांच्या कार्यकाळात पाचगावमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व मूलभूत सुविधांच्या माध्यमातून भरीव विकास झाला. त्यांच्या विकासात्मक धोरणांना पुढे नेत सध्या सरपंच प्रियांका पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पाचगावमध्ये विकासाची गंगा अखंडपणे वाहत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना संग्राम पाटील म्हणाले की, “पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण व शाश्वत विकास करण्यासाठीच मी ही उमेदवारी स्वीकारली आहे. ग्रामपातळीवर केलेल्या विकासाचा अनुभव जिल्हा परिषदेमध्ये उपयोगात आणून मतदारसंघाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा माझा निर्धार आहे.”
अनुभव, पारदर्शक कारभार आणि विकासाचा ठोस दृष्टिकोन यामुळे संग्राम पाटील यांच्या उमेदवारीकडे मतदारसंघाचे लक्ष केंद्रित झाले असून, आगामी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच लढवली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

