
कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील यांच्या पत्नी सौ. संगीता शंकर पाटील यांनी आज पन्हाळा येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात अधिकृत प्रवेश केला. यावेळी मतदारसंघात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
अर्ज दाखल करताना प्रशांत पाटील, सागर वर्पे, संभाजी सुतार, महादेव पाटील, हिंदुराव लव्हटे, राज लव्हटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “विकास हाच अजेंडा” या ठाम भूमिकेवर जनसुराज्य शक्ती पक्ष या निवडणुकीत उतरल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
माजी जि.प. सदस्य शंकर पाटील यांनी आपल्या कार्यकाळात कोतोली मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शैक्षणिक सुविधा तसेच मूलभूत नागरी सोयीसुविधांच्या माध्यमातून विकासाची ठोस पायाभरणी केली. रखडलेली कामे मार्गी लावून मतदारसंघाचा सर्वांगीण चेहरा बदलण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
याच विकासाची परंपरा पुढे नेत सौ. संगीता शंकर पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा वेगवान व समतोल विकास साधण्यासाठी पुन्हा एकदा रिंगणात उतरलो असल्याचे शंकर पाटील यांनी यावेळी सांगितले. जनतेच्या विश्वासावर विकासाची गती अधिक वाढवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल होताच कोतोली मतदारसंघात निवडणुकीची रंगत वाढली असून, जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

