
इचलकरंजी / प्रतिनिधी :जानवी घोगळे
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घराणेशाहीचा प्रभाव दिसून आला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी आमदार, खासदार व मंत्र्यांना स्पष्ट आदेश देत त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला उमेदवारी देऊ नये, असे निर्देश दिले होते. या निर्णयाचा परिणाम म्हणून राज्यातील अनेक ठिकाणी नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारीतून माघार घ्यावी लागली होती. कोल्हापूरमध्येही कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी मागे घेत उदाहरण निर्माण केले होते.
मात्र, आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा घराणेशाहीने डोके वर काढल्याचे चित्र दिसून येत आहे. इचलकरंजीतील प्रभावी आणि वजनदार समजल्या जाणाऱ्या आवाडे घराण्याची राजकीय रणनीती सध्या जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे

.
भाजपचे आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका राहुल आवाडे आणि पत्नी मोसमी राहुल आवाडे यांनी एकाचवेळी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुधवारी (ता. २१) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हाभरात मोठी धावपळ पाहायला मिळाली.आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे यांनी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी हातकणंगले तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सानिका यांच्या उमेदवारीमुळे आवाडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, सानिका आवाडे या आवाडे कुटुंबातील राजकारणात सक्रिय होणाऱ्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहेत.दरम्यान, याचवेळी आमदार राहुल आवाडे यांच्या पत्नी मोसमी आवाडे यांनी रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार शिवाजी मुरलीधर जाधव यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजप आमदारांच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी केल्याने महायुतीतच संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

रेंदाळ हा मतदारसंघ आमदार राहुल आवाडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच मतदारसंघातून ते पूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. या मतदारसंघावरील आपले राजकीय वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठीच ही रणनीती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत नेमके काय घडते, महायुतीमध्ये तोडगा निघतो की संघर्ष अधिक तीव्र होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात माजी खासदार *कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार *प्रकाश आवाडे आणि विद्यमान आमदार राहुल आवाडे यांचा कायमच मोठा दबदबा राहिला आहे. आता सानिका आणि मोसमी आवाडे यांच्या उमेदवारीमुळे आवाडे घराण्याची ताकद पुन्हा एकदा मतपेटीतून सिद्ध होते का, की पक्षाच्या आदेशांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.


