
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
समाजात वाढत चाललेली विषमता, तेढ आणि द्वेषभावना दूर करून बंधुता, समता व सामाजिक ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने सामाजिक समरसता मंच, कोल्हापूर यांच्या वतीने ‘बंधुता परिषद’चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवार, दिनांक 25 जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत प्रतिमा नगर हौसिंग सोसायटी सभागृह, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९३० रोजी सातारा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट देऊन दिलेल्या ऐतिहासिक भाषणात बंधुतेचा संदेश ठामपणे मांडला होता. “मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आपलेपणाने पाहतो,” असे स्पष्ट मत डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केले होते. त्याच विचारांचा जागर करत सामाजिक ऐक्यासाठी ‘बंधुता परिषद’ आयोजित करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून प्रा. मच्छिंद्र सकटे (अध्यक्ष, दलित महासंघ) आणि श्री. क्षितिज टेकसास गायकवाड (विश्वस्त, दत्तकृपा धर्मभूषण ट्रस्ट) उपस्थित राहणार आहेत. समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर संवाद, समज आणि सलोखा निर्माण करण्यासाठी बंधुतेचे महत्व या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वसुधा वसंतराव शिर्के तसेच इचलकरंजी येथील प्रा. डॉ. अमर कांबळे यांची उपस्थिती लाभणार आहे. विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत मान्यवर, अभ्यासक, युवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने या परिषदेला उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बंधुतेच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा विचार पुढे नेणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. सध्याच्या काळात सामाजिक एकोप्याची गरज अधिक तीव्र झाली असून, अशा उपक्रमांमधून सकारात्मक संवादाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील वांकर, तानाजी रावळ, स्वप्नील नाईक, अमर कांबळे व विद्या अनिल कामत आदी संयोजक परिश्रम घेत आहेत.

