
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात श्री गणेश जयंतीचा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे. पहाटेपासूनच विविध गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात शहर भक्तीमय झाले होते.
शहरातील ऐतिहासिक ओढ्यावरील गणपती मंदिरात पहाटे विशेष अभिषेक, आरती व नैवेद्य अर्पण करण्यात आला. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. त्याचप्रमाणे जाऊळाचा गणपती येथेही गणेश जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
चंबुखडी येथील गणपती मंदिरात भजन, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसर भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. आर. के. नगर येथील गणपती मंदिरातही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत गणरायाचे दर्शन घेतले.
दरम्यान, कोल्हापूरचे आराध्य दैवत असलेल्या श्री अंबाबाई मंदिरातील श्री गणेश मंदिरात विशेष पूजाअर्चा करण्यात आली. श्री अंबाबाईच्या चरणी गणेश जयंतीनिमित्त भाविकांनी दर्शन घेऊन सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
सकाळपासूनच विविध मंदिरांतून आरतीचे निनाद, फुलांची सजावट, दीपोत्सव व प्रसाद वितरण यामुळे कोल्हापूर शहरात गणेश जयंतीचा उत्साह सर्वत्र जाणवत होता. भाविकांनी शांततेत व श्रद्धेने दर्शन घेत गणरायाच्या कृपेची प्रार्थना केली.

