
श्रीपतराव चौगुले कॉलेज, माळवाडी–कोतोली येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व प्राचार्या डॉ. संपदा पिसे. समवेत डॉ. वंदना पाटील, डॉ. बी. एन. रावण, डॉ. एस. एस. कुरलीकर, प्रा. ए. आर. महाजन, डॉ. यु. एन. लाड व मान्यवर.
प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील
कोतोली | प्रतिनिधी
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा त्याग, शौर्य आणि देशासाठीचे बलीदान तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निर्भीड विचार, सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष व मराठी माणसाच्या सन्मानासाठीची लढाई आजच्या तरुण पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथील प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
ते कॉलेजच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सांस्कृतिक विभाग व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रतिमा पूजन व मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलत होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले की, “तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन” हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वाक्य केवळ घोषणा नसून संपूर्ण राष्ट्राला त्याग, धैर्य व बलिदानाची प्रेरणा देणारे होते. ‘जय हिंद’ या घोषणेद्वारे त्यांनी देशाला एकतेच्या सूत्रात बांधले. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे लहानपणापासूनच निर्भीड, स्पष्टवक्ते व अन्यायाविरुद्ध परखड भूमिका घेणारे नेते होते. मराठी माणसाचा हक्क, सन्मान व अस्तित्वासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना इतिहास विभागातील सहा. प्रा. पी. डी. माने यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे या दोन्ही वादळी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. नेताजींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौजेची स्थापना करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा आवाज बुलंद केला, तर बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक व सामनासारख्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत मराठी माणसावरील अन्यायाविरुद्ध शिवसेनेची स्थापना केली. झुणका-भाकरी केंद्र, वृद्धाश्रम, झोपडपट्टीवासीयांसाठी पक्की घरे, मुंबई–पुणे महामार्ग यांसारख्या संकल्पनांचे मूळ बाळासाहेबांच्या विचारात असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संपदा पिसे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास संस्था सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्या डॉ. संपदा पिसे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. वंदना पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. डॉ. बी. एन. रावण, सहसमन्वयक डॉ. एस. एस. कुरलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. ए. आर. महाजन यांनी केले तर आभार डॉ. यु. एन. लाड यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

