
प्रतिनिधी : जानवी घोगळे
शिवाजी विद्यापीठात ‘सक्षमा’ कार्यशाळेला मोठा प्रतिसाद
कोल्हापूर, दि. २३ : महिलांकडे पाहण्याचा पुरूषांचा दृष्टीकोन बदलण्याबरोबरच महिलांचेही महिलांप्रती वर्तन बदलल्यास समाज खऱ्या अर्थाने बदलेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठाची अंतर्गत तक्रार समिती, बेटी बचाओ अभियान आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आज एकदिवसीय ‘सक्षमा: महिलांविषयक कायदे जाणीव जागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण’ या कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती चाकणकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की प्रमुख उपस्थित होते.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची पुरोगामी नगरी असून महाराणी ताराराणी यांच्या कार्याचाही तिला वारसा आहे. इथून सुरू झालेला महिला सक्षमीकरणाचा विचार संपूर्ण राज्यभर जाईल, याची खात्री असल्यानेच या उपक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यात महिला हक्कांसाठीचा लढा लढत असताना पुरूषांची मानसिकता बदलल्यास समाज बदलेल, हे खरेच आहे. पण महिलांचे अधिकार नाकारण्यात महिलाच अधिक पुढाकार घेतात, हेही खरे आहे. त्यामुळे महिलांनीही आपली मानसिकता बदलून अन्य महिलांची मानहानी करू नये. विशेषतः विधवा महिलांचे हळदीकुंकू घडवून आणा, त्यांची सौभाग्यलेणी काढू नका, त्यांना विविध समारंभात सामावून घ्या, मुलीच्या जन्माला पाठिंबा द्या, बालविवाहाविरोधात उभे राहा. सावित्रीबाई फुले यांनी पावणेदोनशे वर्षांपूर्वी सुरू केलेल्या लढ्यामधून आजवर आपण बाईपणाची लढाई लढलो, आता यापुढील काळात आईपणाची लढाई लढण्यासही सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला दिला. त्याद्वारे आपण आपल्या मुलींना शिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. त्यामधून निर्माण होणारे आत्मबल आपल्याला सन्मानप्राप्तीच्या लढ्याला प्रवृत्त करेल. महिलांमध्ये आरोग्यविषयक जाणीवा आणि आर्थिक सक्षमता निर्माण होण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असल्याचे मत चाकणकर यांनी व्यक्त केले.

‘अंतर्गत तक्रार समित्यांचे लेखापरीक्षण अनिवार्य’
२२ जुलै २०२५च्या सुधारित कायद्यानुसार आता महिला आयोगाला दंडात्मक कारवाईचे अधिकार प्राप्त झाले आहेत. हा कायदा आता ३१ टक्के नोकरदार महिलांचा सक्षम आधार बनला आहे. हा कायदा म्हणजे महिलांसाठीचे एक प्रभावी शस्त्र आहे. अंतर्गत तक्रार समित्यांबाबतही आयोग अतिशय आग्रही असून सर्वच कार्यस्थळी त्यांची स्थापना आणि कामकाज आवश्यक आहे. या समित्यांना आता लेखापरीक्षण करवून घेणेही अनिवार्य करण्यात आले असल्याची माहितीही चाकणकर यांनी दिली.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्त्वाचे सूत्र महिला सन्मान हे होते. शिवाजी विद्यापीठाने सुरवातीपासून हे सूत्र सांभाळले आहे. आज संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही दृष्टीने विद्यापीठातील विद्यार्थिनींचे प्रमाण मोठे आहे. विद्यापीठात प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण ६५ टक्के असून पुरस्कार प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण ९० टक्के आहे. या विद्यार्थिनींना आवश्यक सर्व सुविधा आणि सुरक्षा पुरविण्याविषयी विद्यापीठ काळजीपूर्वक प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी स्वागत केले. निवासी प्रकल्प अधिकारी लक्ष्मण मानकर यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर अंतर्गत तक्रार समितीच्या अध्यक्ष माधुरी वाळवेकर यांनी आभार मानले.

यावेळी मंचावर आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले, महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, शिल्पा पाटील आणि वर्षा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमास डॉ. रुपा शहा, डॉ. शरद बनसोडे, डॉ. प्रभंजन माने यांच्यासह विविध महिला संस्था, संघटनांच्या प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.विविध कायद्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन उद्घाटन सत्रानंतर दिवसभरात विविध सत्रांमध्ये महिलांविषयक विविध कायद्यांबाबत कार्यशाळेत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. भारती पाटील यांनी ‘’पॉश’ कायदा नेमकं काय सांगतो?’, डॉ. सुनील कुबेर, डॉ. गीता हसूरकर आणि अॅड. गौरी पाटील यांनी ‘पी.सी.पी.एन.डी.टी. बाबत जनजागृती’, डॉ. प्रतिभा देसाई यांनी ‘स्वयंसिद्धाची माहिती व स्त्रीशक्ती पोर्टल’, अॅड. सीमा पाटील आणि नंदिनी जाधव यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन आजच्या काळात का आवश्यक आहे?’ या विषयांवर मार्गदर्शन केले.

