
पाचगाव | प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
पाचगाव–उजळाईवाडी परिसरातील राजकीय वातावरण तापवणारा प्रचाराचा भव्य शुभारंभ आसोबा देवालय, उजळाईवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम गोपाळराव पाटील आणि उजळाईवाडी पंचायत समितीच्या उमेदवार शिल्पा संदीप हजारे यांच्या प्रचाराचा अधिकृत प्रारंभ या वेळी करण्यात आला.ग्रामदैवत आसोबा देवाच्या साक्षीने विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली असून परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगले आहे.यावेळी सरपंच उत्तम आंबवडे, उपसरपंच प्रकाश पाटील, तंटामुक्त अध्यक्ष नायकु बागणे, संदीप पोवार, शिवाजी माने, सुनील गुमाणे, प्रकाश सुर्यवंशी, नंदकुमार गजणे, संपत दळवी, डी. जी. माने, काकासो पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी उपस्थितांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला आणि उमेदवारांच्या कार्यकर्तृत्वाला भक्कम पाठिंबा जाहीर केला. विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.या प्रचार शुभारंभामुळे पाचगाव–उजळाईवाडी परिसरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाली असून आगामी निवडणुकीत या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

