
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कोतोली फाटा ते नांदारी दरम्यान सुमारे सव्वातीनशे कोटी रुपये खर्चून सुरू असलेल्या रस्ते व गटारी कामांनी जनतेच्या अपेक्षा नाही, तर संतापाच्या कडेलोटाला नेले आहे. निकृष्ट, बिननियोजित आणि मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या कामांमुळे कोतोली गावात वाहतुकीची कोंडी ही आता नित्याची बाब बनली आहे.कोतोली बाजारपेठेत गटारीवरच सर्रास बांधकाम करण्यात आले आहे. त्यावरच गाड्या उभ्या आहेत. वडाप गाड्या, प्रवासी वाहने आणि अस्ताव्यस्त दुचाकी पार्किंग यामुळे बाजारपेठेतून वाहनांना फिरणे अशक्य झाले आहे. परिणामी ग्राहकांची संख्या झपाट्याने घटत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले जात आहे. ही बाजारपेठ गावाची जीवनवाहिनी असताना तीच आज ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे गुदमरून टाकली आहे.इतकेच नव्हे तर रस्ता तीन ठिकाणी पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने व अवैज्ञानिक रितीने करण्यात आल्याने एसटी बस आदळण्याच्या घटना घडत आहेत. दररोज शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. मात्र एसटी चालकांना कसरत करत बस चालवावी लागत असून प्रवाशांचे जीव अक्षरशः धोक्यात आले आहेत.

एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.नणुंद्रे ते नांदगाव दरम्यान ठिकठिकाणी नियोजित गटारी बांधण्याऐवजी केवळ पाईप टाकून काम उरकण्यात आले आहे, तर कोतोली फाटा ते पोर्ले दरम्यान मात्र रुंद रस्ता व मोठ्या गटारी केल्याचे स्पष्टपणे दिसते. दुसरीकडे वाघवे ते कोलोली दरम्यान पहिल्यापेक्षाही अधिक अरुंद रस्ता करून अपघातांना आमंत्रण दिले आहे.एकाच प्रकल्पात असा उघड उघड दुजाभाव का? हा प्रश्न आता रस्त्यावर उतरला आहे.“हा रस्ता जनतेच्या सोयीसाठी आहे की ठेकेदारांना पोसण्यासाठी आणि नेत्यांना ढपला पाडण्यासाठी?” असा थेट, जहरी आणि अस्वस्थ करणारा प्रश्न प्रवासी, व्यापारी व ग्रामस्थ विचारत आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असताना दर्जेदार काम, सुरक्षितता आणि नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून येत आहे. संबंधित अधिकारी, अभियंते आणि लोकप्रतिनिधी मूक प्रेक्षक बनून तमाशा पाहत आहेत का? असा रोष व्यक्त होत आहे.
दरम्यान, निवडे येथील गटारी तात्काळ नियमानुसार, दर्जेदार व कायमस्वरूपी पद्धतीने बांधण्यात याव्यात, अन्यथा लहुजी संघर्ष सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण तात्या तांदळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आणि निर्णायक आंदोलन छेडले जाईल, असा कडक व ठाम इशारा देण्यात आला आहे.
कोट
सदरचा रस्ता आसुर्ले पोर्ले वगळता अन्य ठिकाणी ढिसाळ नियोजनामुळे रस्ता केला आहे.तसेच उत्रे, पिंपळे व कोतोली येथील पुलावर दोन्ही बाजूला वाहणं आदळतात यामुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे.तरी वेळीच याठिकाणी रस्ता दुरुस्त करावा.
गुंडोपंत वडर राष्ट्रवादी सेवादल अध्यक्ष
“जनतेच्या पैशांची लूट, प्रवाशांच्या जीवाशी खेळ आणि व्यापाऱ्यांची गळचेपी आम्ही सहन करणार नाही. गरज पडली तर रस्त्यावर उतरून प्रशासनाला जागे करू,” असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
आता प्रश्न एकच आहे —
अपघात, बाजारपेठेचा ऱ्हास आणि जनतेचा उद्रेक झाल्यावर जबाबदारी कोण घेणार?
की सव्वातीनशे कोटींचा हा रस्ता कायमचा ‘भ्रष्टाचाराचा स्मारक’ ठरणार?
फोटो ओळ निवडे नांदगाव येथे बांधकाम गटारी मंजूर असताना पाईप टाकून गटारी केल्या आहेत.


