खासदार धैर्यशील माने यांची भूमिका अजूनही अंधारात;निवडून आल्यापासून पन्हाळा तालुक्याकडे पाठ फिरवलीच!

0
28


कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी अद्याप पन्हाळा–शाहूवाडी तालुक्यात कोणाला पाठिंबा दिला आहे, हे स्पष्ट केलेले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, निवडून आल्यापासून आजतागायत खासदार माने यांनी पन्हाळा तालुक्याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली असल्याची तीव्र भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे.
खासदार धैर्यशील माने यांच्या विजयात आमदार विनय कोरे यांची भूमिका निर्णायक ठरली, हे सर्वश्रुत असताना, आज त्याच पन्हाळा–शाहूवाडी तालुक्यात खासदारांची ठोस भूमिका नसणे हे राजकीय कृतघ्नतेचे उदाहरण मानले जात आहे. तालुक्यातील प्रश्न, विकासकामे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत खासदारांकडून कोणतेही स्पष्ट दिशादर्शन मिळालेले नाही, ही बाब कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण करणारी ठरत आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी मत मागायचे, पण निवडून आल्यानंतर तालुक्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे, हा दुटप्पीपणा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. “आम्ही कुणासाठी काम करायचं? खासदार आमच्या सोबत आहेत की नाही?” असा थेट सवाल आता कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
राजकारणात मौन ही कधी कधी भूमिका असू शकते, मात्र सध्याच्या परिस्थितीत खासदार धैर्यशील माने यांचे मौन संभ्रम वाढवणारे, कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करणारे आणि पन्हाळा तालुक्यावर अन्याय करणारे ठरत आहे.
आता खासदार माने तालुक्याकडे पाठ फिरवण्याची भूमिका कधी बदलणार?
की पन्हाळा–शाहूवाडी तालुका फक्त निवडणुकीपुरताच महत्त्वाचा होता?
हा प्रश्न आता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here