
पाचगाव | प्रतिनिधी :पांडुरंग फिरंगे
पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संग्राम गोपाळराव पाटील (जिल्हा परिषद), सीमा पोहाळकर (पाचगाव पंचायत समिती) तसेच डॉ. शिल्पा हजारे (उजळाईवाडी पंचायत समिती) यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन काँग्रेसचे नेते तथा आमदार सतेज पाटील यांनी केले. पाचगाव येथे आयोजित जाहीर प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले की,
“पाचगाव मतदारसंघातील जनतेने मला याआधीही भक्कम साथ दिली आहे. हीच साथ यापुढेही द्या. तुमच्या विश्वासाच्या जोरावर पाचगाव मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावून पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघ राज्यात आदर्श व ‘मॉडेल’ बनविला जाईल,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आमदार पाटील पुढे म्हणाले की, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था, महिला व युवकांचे सक्षमीकरण, शेतकरी हिताचे प्रश्न यांना प्राधान्य दिले जाणार असून निधीअभावी कोणतेही विकासकाम रखडू दिले जाणार नाही. “लोकप्रतिनिधी जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे असावेत. संग्राम पाटील, सीमा पोहाळकर व डॉ. शिल्पा हजारे हे तळागाळातील प्रश्न जाणणारे व काम करणारे उमेदवार आहेत. त्यांच्या विजयातूनच पाचगाव परिसराचा खरा विकास साध्य होईल,” असेही त्यांनी नमूद केले.

या मेळाव्यात जिल्हा परिषद उमेदवार संग्राम गोपाळराव पाटील, पंचायत समिती उमेदवार सीमा पोहाळकर व डॉ. शिल्पा हजारे यांनीही मनोगत व्यक्त करत, मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, विकासकामे व पारदर्शक कारभाराला प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या जाहीर प्रचार मेळाव्यास पाचगाव, आर. के. नगर, मोरेवाडी, उजळाईवाडी आदी गावांतील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचंड प्रतिसादामुळे सभास्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


