
जुना बुधवार तालीम हॉल येथे धोकादायक महामार्गाच्या विरोधात झालेल्या नागरिकांच्या बैठकीत उपस्थित मान्यवर व पेठकरी.
कोल्हापूर | प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
जुना बुधवार पेठेतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आज नागरिकांसाठी विकासाचा मार्ग नसून मृत्यूचा सापळा ठरत आहे. दिवसेंदिवस वाढणारी अवजड वाहतूक, सातत्याने होणारे अपघात आणि शाळकरी मुलांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घ्यावा लागत असल्याने या गंभीर प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यासाठी आज सायंकाळी जुना बुधवार तालीम हॉल येथे नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली
ही बैठक माजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ७ वाजता झाली. पेठेतील नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून आपल्या असह्य वेदना आणि रोष व्यक्त केला.
“हा हायवे पेठेतून हटवायलाच हवा”
प्रास्ताविक करताना तालीम अध्यक्ष रणजित शिंदे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “हा धोकादायक हायवे लवकरात लवकर बंद होऊन शहराबाहेरून गेला पाहिजे. यासाठी सर्व पक्षीय नेते, प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधणे अत्यावश्यक आहे.”
उड्डाणपुलाचा मार्ग बदलण्याची ठाम मागणी
सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी स्पष्टपणे मांडले की, तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज पूल या नवीन प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करून तो दसरा चौक मार्गे खानविलकर पंप या मार्गावरून न्यावा. यासाठी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निवेदन द्यावे, अशी ठोस भूमिका त्यांनी मांडली.
नियम धाब्यावर बसवून वाहतूक सुरू
संतोष दिंडे यांनी अवजड वाहतुकीवर बंदी असतानाही वेळेपूर्वी या मार्गावरून वाहतूक सुरू असल्याकडे लक्ष वेधत, ती तात्काळ थांबवावी अशी जोरदार मागणी केली.
“गरज पडली तर रस्ता रोको!”
उदय भोसले यांनी प्रशासनाचे कान उघडण्यासाठी रस्ता रोको आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा दिला.

संघटित लढ्याचा निर्धार
हिंदू एकता संघटनेचे दिपक देसाई यांनी “हा प्रश्न केवळ एका पेठेचा नसून संपूर्ण शहराच्या सुरक्षिततेचा आहे. संघटितपणे लढा दिल्याशिवाय न्याय मिळणार नाही,” असे सांगितले.
लोकप्रतिनिधींनी कायमस्वरूपी तोडगा काढावा
माजी नगरसेवक धनंजय सावंत यांनी खासदार, आमदार आणि महानगरपालिकेतील नव्या नगरसेवकांनी आयुक्तांसमोर या प्रश्नाचे गांभीर्य प्रभावीपणे मांडून कायमस्वरूपी उपाय काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
“जनभावनेसमोर कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही”
अध्यक्षीय भाषणात माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी सांगितले,
“जर नागरिक संघटित झाले, तर लोकप्रतिनिधी आणि शासन यांना याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रथम निवेदन, त्यानंतर चर्चा आणि गरज भासल्यास आंदोलनाचे टप्पे ठरवून हा प्रश्न शासन स्तरावर मार्गी लावला पाहिजे.”
यशाचा विश्वास
आभारप्रदर्शन करताना धिरज रुकडे यांनी “बुधवार पेठेची एकजूट हीच आपली ताकद आहे. या संघटित लढ्याला नक्कीच यश मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला.
बैठकीत खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन देऊन प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
यावेळी रणजित शिंदे, संतोष दिंडे, सुशील भांदिगरे, दिपक देसाई, उदय भोसले, माजी नगरसेवक धनंजय सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

