
(पत्रकार निखिल गोखले ,कोल्हापूर)अंगात पांढरा सदरा आणि विजार , गळ्यात बाराही महिने भगवा दुपट्टा डोक्यावर संघाची काळी टोपी ही वेशभूषा असलेली व्यक्ती कोल्हापूरकरांना मुख्यत्वे करून महाद्वार रोडवरील मंडळींना अनोळखी नाही. *प्र द गणपूले* म्हटल की वांगीबोळा समोरील महाद्वार रोडवर आबा टेलर च्या शेजारील जागेवर सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत पेपर वाचत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या नमस्कारचा स्वीकार करणारी व्यक्ती होय . संपूर्ण आयुष्यभर निष्ठावान भाजपचे पदाधिकारी , फेरीवाले झोपडपट्टी धारक कष्टकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणारे अशी त्यांची ओळख . शुक्रवारी दुपारीच त्यांची प्राणज्योत मावळल्याने शनिवारपासून महाद्वार रोड आता या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाला कायमचा पोरका झाला आहे . गणपुले यांना भाऊसाहेब असेही प्रेमाने सर्व मंडळी संबोधत असत . त्यांचे आणि महाद्वार रोडवरील प्रत्येक व्यक्तीचे एक वेगळेच नाते गेल्या पाच ते सहा दशकापासून पाहायला मिळत आहे . राजकारणाच्या गप्पा , समाजकारणातील विषय भाऊसाहेब कायमच आपले परखड विचार मांडत असत . पूर्वीच्या जनसंघापासून ते आत्ताच्या भारतीय जनता पार्टी पर्यंत प्रत्येक घडामोडीचे ते साक्षीदार होते . वांगीबोळ – महाद्वार रोड परिसरात राहणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आपुलकी होती . प्रत्येकासाठी ते घरातील एक सदस्य असल्यासारखे होते . त्यामुळे राष्ट्रीय सण असो , आनंदउत्सव असो किंवा अन्य कोणताही उपक्रम महाद्वार रोडवरील प्रत्येक कार्यक्रमांमध्ये भाऊसाहेबांची उपस्थिती ही ठरलेली असायची . त्यांनी कधी लग्न केले नाही त्यामुळे संसार नातेवाईक अशात ते कधीच अडकले नाहीत . महाद्वार रोडवरील कष्टकरी , शहरातील झोपडपट्टी धारक , हात गाडीवाले यांचेच प्रश्न हेच त्यांचे कुटुंबीय . ते कायमच स्वावलंबी जगणे पसंत करत होते . महाद्वार रोडवरील काही मंडळींनी भाऊ साहेबांसाठी काकडे बोळात खोलीची व्यवस्था केली होती . तेथील एक खाट , पंचानन मासीकाची पुस्तके , आणीबाणी काळातील वर्तमानपत्राची काही कात्रणे , पक्षाचे जुने फोटो हीच काही ती त्यांची प्रॉपर्टी . प्रसंगी चुरमुरे फुटाणे खाऊन त्यांनी दिवस काढले होते . कोल्हापुरात भारतीय जनता पक्ष रुजवण्यात सुभाष वोरा , ज गो कुलकर्णी आणि भाऊसाहेब यांच्यासारखे मोजकेच लोक होते . वांगी-बोळातील पक्ष म्हणून अनेकदा त्यांची हेटाळणीही होत असे . अनेकदा अन्य राजकीय पक्षातील मंडळी यावरून चेष्टा मस्करी करत असत . पण भाऊसाहेबांनी कधीही राग मनात धरला नाही . शेवटपर्यंत निष्ठेने ते पक्ष संघटनेचे काम करत राहिले . गेल्या बारा वर्षात भाजपला सुगीचे दिवस आले आहेत . पक्षाने आणीबाणीतील राजे बंदी असलेल्यांसाठी सुरू केलेल्या मानधनाचा लाभ त्यामुळे भाऊसाहेबांनाही मिळत होता . पण सत्तेत आलेल्या पक्षाने आमच्यासाठी अजून काहीतरी करावे वगैरे अशी लालसा कधीही त्यांनी बोलूनही दाखवली नाही किंवा मनातही आणली नाही . आज भाऊसाहेब संपूर्ण महाद्वार रोडला कायमचे पोरके करून गेले आहेत . इथून पुढे महाद्वार रोडवरील त्या कॉर्नरवर ते कधीच बसलेले दिसणार नाहीत . पण रोड वरून येणाऱ्या जाणाऱ्याला मात्र एक क्षणभर का होईना मोकळी जागा पाहून त्यांची आठवण मात्र कायमच येणार**आणि भविष्यवाणी खरी ठरली* इन बिन साडेतीन कार्यकर्त्यांचा पक्ष अशी एकेकाळी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीने कोल्हापुरात आपला महापौर शुक्रवारी बसवला . पण याची भविष्यवाणी गणपुले यांनी कित्येक वर्षा आधी केली होती . कोल्हापूर महापालिका स्थापन झाल्यानंतर जनसंघ (भाजप) च्या काही स्थानिक नेत्यांनी निवडणूक लढवली होती . त्यामध्ये भाऊसाहेबांचाही सहभाग होता . ते निवडून जरी आले नसले तरी त्यांनी तेव्हा एक ना एक दिवस माझ्या पक्षाचा नगराध्यक्ष होईल असे विधान केले होते . त्यावेळी अनेकाने त्यांना खुळ्यात काढले होते . पण शुक्रवारी ते जगाचा निरोप एकीकडे घेत होते तर दुसरीकडे भाजप पक्षाच्या पहिल्या महापौर सभागृहात विराजमान होत होत्या . पक्ष कार्यकर्त्यांनी तर अख्खा महापालिका चौकच गुलाबी केला होता . *स्वर्गाकडे मार्गक्रमण करत असताना भाऊसाहेब मात्र नक्कीच समाधानाचे हास्य घेऊन परमेश्वराला म्हणत असावेत शेवटी माझे खरे ठरले ना* **तुम्ही लिहून घ्या मी आलोच* भाऊसाहेब जसे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत होते तसेच ते शैक्षणिक क्षेत्रातही काही काळ कार्यरत होते . ४५ ते ५० वर्षांपूर्वी ते विद्यार्थ्यां ची शिकवणी वांगीबोळात घेत असत . एक दिवस शिकवणी घेत असतानाच फळ्यावर लिहिलेला अभ्यास त्यांनी विद्यार्थ्यांना लिहायला सांगितला आणि तुम्ही लिहून काढा मी तोवर रेल्वे स्थानकावर एक आंदोलन आहे ते करून येतो असे सांगितले . विद्यार्थ्यांनी लिहून झाल्यावर एक तास दोन तास वाट पाहिली भाऊसाहेब काही आलेच नाहीत . त्यानंतर रवी देशपांडे शेखर धर्माधिकारी केशव स्वामी अशा काही निवडक विद्यार्थ्यांनी जाऊन माहिती घेतली असता भाऊसाहेबांना आंदोलना दरम्यान अटक झाल्याची माहिती मिळाली . आजही हा जुना किस्सा वांगी बोळात प्रचलित आहे .(मोबा – ९८९०३७१०७०)

