पंचगंगा स्मशानभूमीच्या घाटावर दारू-गांजाचा उच्छादपोलीस प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे परिसरात दहशतीचे वातावरण

0
23


कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर शहराची ओळख असलेल्या पंचगंगा स्मशानभूमीतील रक्षा विसर्जन घाट व म्हशी घाटाकडे जाणारा रस्ता, तसेच त्याला लागून असलेला केस दान करणारा घाट सध्या असामाजिक तत्वांचे अड्डे बनत चालले आहेत. दररोज रात्री ७ ते १० वाजण्याच्या सुमारास या परिसरात खुलेआम दारूच्या पार्ट्या, गांजा ओढणारी तरुण मंडळी, शिवीगाळ, भांडणे व मारामारीचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे.विशेष म्हणजे स्मशानभूमी रोडवरील रिकामा व वर्दळ नसलेला भाग याचा फायदा घेऊन बाहेरील मद्यपी व गुन्हेगारी प्रवृत्तीची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अत्यंत गंभीर बाब म्हणजे सकाळच्या वेळेत बाहेरील गावांमधून नागरिक रक्षा विसर्जनासाठी येथे येतात, त्यावेळी घाट परिसरात दारूच्या बाटल्या, सिगरेटची पाकिटे, घाण व असभ्य दृश्ये आढळून येतात. यामुळे केवळ या पवित्र घाटाचीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर शहराची नाहक बदनामी होत आहे.


इतक्या संवेदनशील व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी असे प्रकार सुरू असतानाही पोलीस प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष हे अक्षम्य असून संशयास्पदही आहे. वेळीच ठोस कारवाई न केल्यास मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी पंचगंगा स्मशानभूमी परिसरात नियमित पोलीस गस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, रात्रीची कडक निगराणी व दोषींवर तात्काळ कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
आपला —
श्री. सुशिल सुधाकर भांदिगरे
(सामाजिक कार्यकर्ता, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here