
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
: कोतोली पैकी मानेवाडी येथील मुख्य मार्गावर भरलेली श्री रेणुकादेवीची पारंपरिक आंबिल यात्रा यंदा अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाली. “जय रेणुका माता”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची रांग लागली होती.रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष दिपक जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित या यात्रेला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, श्रीकृष्ण दुध संस्थेचे चेअरमन दत्तात्रय चेचरे, ऋषिकेश जाधव, रविंद्र मेंगाणे, रंगराव पाटील, आनंदा पाटील, मानसिंग पाटील, खंडू फिरींगे अशोक पोवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते देवीची विधिवत आरती करण्यात आली.

आरतीच्या वेळी वातावरण भारावून गेले होते; अनेकांच्या डोळ्यांत भक्तीभावाचे अश्रू दाटले.यावेळी नुतन जिल्हा परिषद सदस्या वर्षाराणी अरुण पाटील यांचा संघटनेच्या सदस्या विमल भिमराव पोवार, मंगल पाटील, शारदा पाटील, संगिता पाटील, अनिता पाटील, राणी पाटील, अमृता पाटील, रोहिणी जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. महिलांची लक्षणीय उपस्थिती हे या यात्रेचे विशेष वैशिष्ट्य ठरले. स्त्रीशक्तीच्या सहभागामुळे यात्रेला वेगळेच तेज लाभले.वर्षाराणी पाटील यांनी सौंदतीवरून आलेल्या परड्यांचे विधिवत पूजन करून भक्तांच्या श्रद्धेला मान दिला. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. नैवेद्य आणि पारंपरिक आंबिल देण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. परिसरात भक्तिभाव, उत्साह आणि आनंद यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.रात्री उशिरापर्यंत कोतोली परिसरातील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी प्रभावी शैलीत करून उपस्थितांची वाहवा मिळविली.एकंदरितच, मानेवाडीतील श्री रेणुकादेवीची आंबिल यात्रा ही श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरली. भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाची यात्रा ऐतिहासिक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


