
प्रतिनिधी : जानवी घोगळे
महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त लक्ष्मीपुरी येथील राम स्वामी महादेव मंदिर येथे भजन व महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. हरिनामाच्या गजरात आणि शिवभक्तीच्या वातावरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार मा. श्री. प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित राहून भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी धार्मिक व सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात खटिक समाजाचे उपाध्यक्ष श्री. सोनल घोटणे, श्री. विश्वविक्रम कांबळे, श्री. दीपक बाराले तसेच संयोजक श्री. विकी कांबळे व श्री. सागर कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या पुढाकारामुळे भजन कार्यक्रम आणि महाप्रसादाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.
देशप्रेमी कट्टा ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाविकांसाठी आयोजित महाप्रसादाचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

नगरसेवक आश्किन गणी आजरेकर यांनी आयोजकांचे अभिनंदन करत सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे धार्मिक वातावरणासोबतच सामाजिक एकात्मतेचा संदेशही देण्यात आला.



