भारत-अमेरिका व्यापारी करारा विरोधात किसान काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
40

प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

कोल्हापूर : भारत सरकार आणि अमेरिका सरकार यांच्यात झालेल्या प्रस्तावित व्यापारी कराराच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय किसान काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना जोरदार निवेदन देण्यात आले. या करारामुळे भारतीय शेती आणि शेतकरी वर्गावर गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा देत कराराचा तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली.निवेदनात सन्माननीय पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या करारामुळे भारतीय शेतकरी अमेरिकन शेतीसमोर असमान स्पर्धेत उभे ठाकणार असल्याची टीका करण्यात आली आहे. भारतीय शेतमालावर १८ टक्के कर आणि अमेरिकन शेतमालावर शून्य टक्के कर अशी विषमता असल्याचा आरोप करण्यात आला. हा करार म्हणजे “व्यापारी करार नसून आत्मसमर्पण तह” असल्याचे तीव्र शब्दांत नमूद करण्यात आले.भारतातील शेती ही पारंपारिक पद्धतीवर आधारित असून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. बहुतांश शेतकरी कर्ज काढून शेती करतात.

याउलट अमेरिकेतील शेती आधुनिक तंत्रज्ञान, जीपीएस आणि स्वयंचलित यंत्रणांवर आधारित असून आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे निवेदनात म्हटले आहे. “जमिनीवरून चालणाऱ्याची विमानाशी स्पर्धा लावल्यासारखी परिस्थिती भारतीय शेतकऱ्यांवर येणार आहे,” अशी उपमा देत संताप व्यक्त करण्यात आला.कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादन, दुग्धोत्पादन आणि सोयाबीन पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या करारामुळे संबंधित उपपदार्थांची मोठ्या प्रमाणात आयात होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची आणि बेरोजगारी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारकडे या कराराचा पुनर्विचार करण्याची शिफारस करावी व शेतकरी हिताचे रक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पाटील (राधानगरी), रणजीत पाटील (कागल), संतोष पवार (पन्हाळा), राजाराम निउंगरे, दत्तात्रय चौगुले, मोहन पाटील, रामचंद्र पाटील, राहुल घरात, अमोल कात्रे, रुपेश चौगुले आदी उपस्थित होते.निवेदनावर जिल्हाध्यक्ष सागर शंकर कोंडेकर यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here