‘एनए’ अट रद्द; पण तळागाळात अंधार – नागरिक संभ्रमात, प्रशासन मौनात!

0
26

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

राज्य सरकारने ‘एनए’ (नॉन अ‍ॅग्रीकल्चरल) अट रद्द करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला; मात्र या शासन निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार, याबाबत तळागाळातील यंत्रणेलाच काहीच माहिती नसल्याने ग्रामपातळीवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासनाने निर्णय जाहीर केला खरा; पण गावपातळीवरील सर्कल व तलाठी यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना किंवा लेखी आदेश देण्यात आलेले नसल्याचे समोर येत आहे. परिणामी नागरिकांना घरबांधकाम परवाने कशा पद्धतीने मिळणार? वाढीव गावठाण हद्द कशी लागू होणार? नवीन नियम नेमके काय आहेत? याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

ग्रामपंचायतींकडे स्पष्ट मार्गदर्शक सूचना नसल्याने घरबांधकाम, नकाशे मंजुरी, मालमत्ता नोंदी यांसारखी कामे रखडण्याची शक्यता आहे. “निर्णय जाहीर होतो; पण अंमलबजावणीचे काय?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

याबाबत प्रतिक्रिया देताना शेतकरी संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष संभाजी भोसले म्हणाले, “एनए रद्द करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. पण याबाबत अद्याप तलाठी कार्यालयात कोणतीही माहिती नाही. त्यामुळे नेमकं चाललंय तरी काय म्हणावं या जीआरला.”

सरकारने तात्काळ स्पष्ट परिपत्रक काढून महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांना सुस्पष्ट सूचना द्याव्यात, अन्यथा ‘एनए’ अट रद्द करण्याचा निर्णय केवळ घोषणेतच राहील, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here