
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर महानगरपालिका येथे स्वीकृत नगरसेवक पदासाठी श्री. राहुल माने यांची निवड करण्यात आली असून शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीमुळे विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. शहर विकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी आता श्री. माने यांच्यावर येणार आहे.
श्री. राहुल माने हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय असून युवकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. विविध सामाजिक उपक्रम, शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे तसेच नागरिकांच्या समस्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे.
निवडीनंतर बोलताना श्री. माने यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला. “कोल्हापूर शहराच्या प्रगतीसाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्यास प्राधान्य देणार असून नागरिकांच्या समस्या सोडविणे हीच माझी पहिली जबाबदारी असेल,” असे त्यांनी सांगितले.
शहरातील विविध मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीमुळे महानगरपालिकेच्या कामकाजात नवचैतन्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

