विवेकानंद कॉलेज मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

0
63

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे इतिहास विभागाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
“शिवरायांचे स्वराज्य म्हणजे माणुसकीचा आदर्श”
प्रास्ताविक व स्वागत इतिहास विभाग प्रमुख डॉ. एस. आर. कटृटीमनी यांनी केले. आपल्या मनोगतात ते म्हणाले, “जाती-धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराज हे मानवी मूल्ये जोपासणारे प्रगल्भ विचारांचे तत्त्ववेत्ता राजे होते. ते समतावादी होते आणि मानवी मूल्यांसाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. लोककल्याणकारी शासनव्यवस्था हे त्यांचे अंतिम ध्येय होते. त्यांच्या निस्पृह व निष्कलंक चारित्र्याने स्वराज्याच्या बांधणीचा मजबूत पाया घातला, ज्यावर आज आपण संपन्न व समृद्ध जीवन जगत आहोत.”इतिहास विभागातील प्रा. डॉ. अनिल जांभळे यांनीही शिवराजनीतीचे महत्त्व अधोरेखित करत, “जाणत्या राजाचे विचार आत्मसात केल्याशिवाय शिवराजनीती समजणे शक्य नाही,” असे मत व्यक्त केले.

पदयात्रेत स्वयंसेवकांचा सहभाग
पन्हाळा येथे आयोजित पदयात्रेत महाविद्यालयातील एन.एस.एस. स्वयंसेवक, एन.सी.सी. विभागातील छात्र सहभागी झाले. प्रा. कॅप्टन सुनिता भोसले व प्रा. डॉ. संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. अश्विनी खवळे यांनी मानले. यावेळी ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. एस. के. धनवडे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवरायांच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यक्रमाला उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here