
कोल्हापूर : प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच शहराच्या मध्यवर्ती व अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या बिंदू चौक परिसरात ‘माफिया ग्रुप’ असा ठळक उल्लेख असलेली कमान उभारण्यात आल्याने संतापाची तीव्र लाट उसळली आहे. रमजान महिन्याच्या स्वागताच्या नावाखाली लावण्यात आलेल्या या कमानीवरील ‘माफिया’ शब्दामुळे कायदा-सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण?
नुकत्याच निवडून आलेल्या एका नगरसेवकाच्या प्रभागातील मुख्य गल्लीच्या तोंडावर ही कमान उभारण्यात आली आहे. सणाच्या शुभेच्छांच्या आडून मोठ्या अक्षरांत ‘माफिया ग्रुप’ असा उल्लेख करणे म्हणजे गुन्हेगारी मानसिकतेचे उघड प्रदर्शनच असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे दहशतवादी किंवा गुन्हेगारी अर्थछटा असलेले शब्द झळकवणे ही केवळ बेजबाबदार कृती नसून, शहराच्या शांततेला तडा देणारी बाब असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस प्रशासन झोपेत?
‘कलापूर’ आणि महालक्ष्मीची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात ‘माफिया’ संस्कृतीचा उघड उदोउदो होत असताना पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. निवडणुकीत कायदा-सुव्यवस्थेची ग्वाही देणाऱ्या यंत्रणांनी आता या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे का? अशा प्रकारांना मूक संमती दिली जात आहे का? अशी चर्चा रंगली आहे.

नागरिकांचा तीव्र रोष
विकास आणि सलोख्याच्या मुद्द्यावर मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये या घटनेमुळे प्रचंड नाराजी आहे. सण-उत्सवांच्या पवित्रतेला गालबोट लावत ‘गँग संस्कृती’चे प्रदर्शन करण्यामागचा हेतू काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नियमांची सर्रास पायमल्ली?
सार्वजनिक ठिकाणी कमान किंवा फलक उभारण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक असते. संबंधित कमान लावताना सर्व नियमांचे पालन झाले का? परवानगी दिली असल्यास ती कोणत्या निकषांवर? आणि परवानगी नसताना उभारली असेल तर ती तात्काळ हटवली का जात नाही? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
दरम्यान, हिंदू एकता आंदोलन चे जिल्हा प्रमुख दिपक देसाई यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवून, “बिंदू चौकातील ही कमान तात्काळ हटवावी व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,” अशी ठाम मागणी केली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात उघडपणे ‘माफिया’चा प्रचार होत असेल आणि प्रशासन शांत असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. कायद्याचा धाक उरला आहे की नाही, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कठोर पावले उचलली नाहीत, तर चुकीचा संदेश समाजात जाणे अटळ आहे.

