राज्यमार्ग क्र. १९१ वर अतिक्रमण सहन केले जाणार नाही; ग्रामपंचायतींना बांधकाम विभागाचा कडक अल्टिमेटम

0
65

प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

कोल्हापूर : कोतोली फाटा ते नांदारी या महत्त्वाच्या मार्गासह रा.मा.क्र. २०४ पासून केर्ली–कोतोली–नांदगाव–नांदारी या राज्यमार्ग क्र. १९१ (कि.मी. ०/०० ते २९/००) वर सुरू असलेल्या विद्रुपीकरण आणि विनापरवाना अतिक्रमणाबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पन्हाळा यांनी ग्रामपंचायतींना कडक शब्दांत अंतिम इशारा दिला आहे. रस्त्याच्या हद्दीत शेण लावणे, पिंजर ठेवणे, बांधकाम साहित्य, घरगुती साहित्य, कचरा टाकणे तसेच वाहने उभी करणे असे प्रकार तात्काळ थांबवून संबंधितांवर कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
सदर मार्ग आशियाई विकास बँकेच्या निधीतून सुधारणा व रुंदीकरणाच्या अंतिम टप्प्यात असून, तरीही अनेक ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. पादचाऱ्यांसाठी राखीव जागेत शेण लावणे आणि साहित्य साठवणे यामुळे वाहतुकीस गंभीर अडथळे निर्माण होत आहेत. अपघातांचा धोका वाढला असून जिवीतहानीची शक्यता नाकारता येत नसल्याचा ठाम इशारा देण्यात आला आहे.महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांच्या दि. ०४.११.१९८७ च्या शासन निर्णयाचा तसेच महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांच्या दि. ०५.०८.२०१९ च्या शासन निर्णयाचा दाखला देत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण व नुकसान हे कायद्याने दंडनीय आहे आणि अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही.“रस्ता हा सार्वजनिक संपत्ती आहे; त्याचा वापर सुरक्षित, स्वच्छ आणि सुरळीत वाहतुकीसाठीच व्हावा. नियमभंग करणाऱ्यांवर शासन निर्णयानुसार कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल,” असा ठाम संदेश सहाय्यक अभियंता श्रेणी–१, सा.बां. उपविभाग, पन्हाळा यांनी जारी केलेल्या पत्रातून देण्यात आला आहे.ग्रामपंचायतींनी आपल्या स्तरावर तात्काळ नोटिसा देऊन अतिक्रमण हटविणे, ग्रामस्थांना जागरूक करणे आणि रस्त्याची शिस्त अबाधित ठेवणे ही सामाजिक व कायदेशीर जबाबदारी असल्याचेही बजावण्यात आले आहे. आदेशाचे पालन न झाल्यास थेट कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आल्याने अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.राज्यमार्ग क्र. १९१ वरील बेकायदेशीर प्रकार आता थांबवले जाणार, असा ठोस संदेश प्रशासनाने दिला असून “कायद्याचा धाक आणि रस्त्याची शिस्त” हीच पुढील भूमिका असेल, हे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here