कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) कडून ऐतिहासिक दरवाढ

0
107

प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे

म्हैस दुधाला ₹१ तर गाय दुधाला तब्बल ₹२ वाढ; उत्पादकांना महिन्याला साडेसात कोटींचा अतिरिक्त लाभ
कोल्हापूर (प्रतिनिधी) – दूध उत्पादकांच्या कष्टाला न्याय देत आणि दुग्ध व्यवसायाला नवी उभारी देण्यासाठी ‘गोकुळ’ने मोठा निर्णय घेत म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीमुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादकांना थेट आर्थिक दिलासा मिळणार असून महिन्याला सुमारे सात ते साडेसात कोटी रुपयांचा अतिरिक्त फायदा होणार आहे.
दि. २१ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणाऱ्या नव्या दरानुसार, म्हैस दुधासाठी (६.० फॅट, ९.० एस.एन.एफ.) प्रतिलिटर दर ₹५२.५० वरून ₹५३.५० करण्यात आला आहे. तर गाय दुधासाठी (३.५ फॅट, ८.५ एस.एन.एफ.) दर ₹३४ वरून थेट ₹३६ प्रतिलिटर करण्यात आला आहे.या निर्णयामुळे दुग्ध व्यवसायात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार असून दूध उत्पादन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
‘गोकुळ’चे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे सांगितले की, “दूध उत्पादक हेच गोकुळचे खरे केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावावा आणि दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पादक, संस्था, सचिव व कर्मचारी हे गोकुळ परिवाराचे अविभाज्य घटक असून त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”गोकुळ संलग्न तब्बल ७,५०० प्राथमिक दूध संस्थांमार्फत दररोज सुमारे १७ लाख लिटर दूध संकलन केले जाते. सद्य बाजारस्थितीचा सखोल विचार करून दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. लवकरच सुधारित दरपत्रक सर्व प्राथमिक संस्थांना पाठविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.दरवाढीच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला नवी गती मिळणार असून, ‘गोकुळ’ने पुन्हा एकदा दूध उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका अधोरेखित केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here