कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : मराठा आणि धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. पण, आरक्षण देणे राज्याच्या हातात नाही. परिणामी या विषयात संयम बाळगण्याची गरज आहे, असे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यावर धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी भंडारा ओतला. यासंंबंधी प्रश्न विचारल्यानंतर ते बोलत होते.
मंत्री केसरकर म्हणाले, आरक्षण मागण्याची एक पध्दत आहे. त्यानुसार मागणी करावी. कोणीही कायदा हातात घेऊ नये. संयम पाळावा. आरक्षण देण्याचे फारसे अधिकार राज्याला नाहीत. हा विषय घटनेशी संबंधीत आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण ते टिकले नाही.
आता पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धनगर समाजाला आरक्षण आहे. पण, त्यांना आरक्षण बदलून हवे आहे. या विषयात आंदोलन करताना संयम ठेवणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या विषयात राज्य सरकार सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करीत आहे.
शरद पवार – अजित पवार यांनी एकत्र यावे
बीडमध्ये शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार यांची सभा मोठी झाली. कोल्हापुरातही असेच होईल. अजित पवार तरूण आहेत. यामुळे हा फरक पडत असेल.
मी अनेक वर्षे शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.