कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या गुजरी गोविंदा ही एक लाखाची दहीहंडी सात मानवी मनोरे रचत शिरोळच्या अजिंक्यतारा गोविंदा मंडळाने फोडली.
गुजरीतील चौकात व्यापारी, सराफ व्यावसायिकांच्या वतीने माजी नगरसेवक किरण नकाते, माधुरी नकाते यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर, कृष्णराज महाडिक, सुहास लटोरे, राजू मेवेकरी-जाधव, मनोज बहिरशेट, आदींच्या उपस्थित झाली.
भव्य स्टेज, नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि त्याला जोड म्हणून मुंबईतील नामवंत कलाकार झोया खान यांचा नृत्याविष्कार, इंडिया गाॅट टॅलेंटमधील झिरो डिग्रीच्या बाल कलाकारांनी सादर केलेले नृत्य आणि जान्हवी व्यास, ढोलकीच्या तालावर फेम लक्ष्मी खैरे यांच्या नृत्याने उपस्थितांना डोलायला लावले.
पस्तीस फुटांवर बांधलेल्या दहीहंडीला प्रथम अजिंक्यतारा गोविंदा पथकाने पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास सात मानवी थर रचून सलामी दिली. त्यानंतर आणखी मंडळांना सहभागी होण्यासाठी संधी देण्यात आली.
अखेरीस रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास अजिंक्यताराचा गोविंदा माऊली सावंत याने सातव्या थरावर जाऊन ही दहीहंडी फोडत एक लाखाचे बक्षीस पटकावले.
दहा हजार युवकांना अयोध्येला नेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेगवान कामाचे कौतुक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
त्यांच्या पुढाकाराने अयोध्येत राममंदिर उभारण्याचे काम जोमात सुरू आहे. या पवित्र भूमीला भेट देण्यासाठी कोल्हापुरातून १० हजार युवकांना स्वखर्चाने घेऊन जाणार आहे, अशी घोषणा केली.