धनंजय महाडिक युवाशक्तीची दहीहंडी फोडून गुरुवारी बाजी मारली.

0
72

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : खचाखच गर्दीने भरलेले दसरा चौक मैदान, जय श्रीराम बोलेगा गाण्यावर थिरकणारी तरुणाई, उपस्थितांच्या मोबाईलचे पेटलेले टॉर्च, टाळ्यांचा कडकडाट आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या वातावरणात गडहिंग्लजच्या नेताजी पालकर व्यायाम मंडळाच्या गोविंदांनी यशस्वीरित्या सात थर लावत धनंजय महाडिक युवाशक्तीची दहीहंडी फोडून गुरुवारी बाजी मारली.

‘नेताजी’ने आत्मविश्वासपूर्वक चढाई करत ३८ फुटांवरील ही हंडी फोडून तब्बल ३ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. खासदार अण्णासाहेब जोल्ले, खासदार धनंजय महाडिक, आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याहस्ते हे बक्षीस प्रदान करण्यात आले.

तर हंडी फोडणारा गोविंदा प्रकाश माेरे यांनी ५१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. युवाशक्तीच्या दहीहंडीचे यंदा दहावे वर्ष होते.

सायंकाळी पाच नंतर दसरा चौक मैदानावर गर्दी होण्यास सुरूवात झाली. साडे सहाच्या सुमारास महाडिक परिवारातील एक एक सदस्य दाखल झाले. पावणे आठ वाजता संघांनी थर लावून सलामी देण्यास सुरूवात केली. अंदाज आल्यानंतर पाच फुटांनी हंडी खाली घेण्यात आली. यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला.

शिरोळच्या जयमहाराष्ट्र आणि जयहनुमानने यशस्वी सहा थर लावले. पण शिरोळच्याच अजिंक्यताराला सहा थर लावण्यात यश आले नाही. गतवर्षीचा विजेता संघर्ष गोविंदा पथक गडहिंग्लजने सात थर लावून उपस्थितांची मने जिंकली.

तर नेताजी पालकरला केवळ पाच थर लावता आले. तासगावच्या शिवगर्जना गोविंदा पथकाने सात थर लावण्याचा प्रयत्न केला.

पुन्हा काही फुटांनी हंडी खाली घेण्यात आली आणि लकी ड्रा काढण्यात आला.

ही स्पर्धा आता नेताजी पालकर, संघर्ष, शिवगर्जना आणि जयहनुमान शिरोळ यांच्यात होणार होती. परंतू लकी ड्रॉमध्ये नेताजी पालकरला हंडी फोडण्यासाठी पहिल्यांदा संधी मिळाली आणि या संधीचे नेताजीच्या गोविंदानी सोने केले.

हंडी फुटल्यानंतर मैदानावर मै हूं डॉन गाण्यावर अवघे मैदान डोलू लागले. नेताजी गोविंदांनी धनंजय महाडिक यांना उचलून घेतले आणि महाडिकांनी या गाण्यावर ठेका धरला.

यावेळी खासदार धैर्यशील माने, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अरूंधती महाडिक, समरजित घाटगे, महेश जाधव, विजय जाधव, राहूल देसाई, राजवर्धन निंबाळकर, राहूल चिकोडे, ए. वाय. पाटील, अमित कदम, समीर शेठ, अशोकराव माने, संग्राम कुपेकर, जयंत पाटील, स्वरूप महाडिक, कृष्णराज महाडिक, विश्वजित महाडिक, सुहास लटोरे उपस्थित होते.

चारूदत्त जोशी, सागर बगाडे, ताज मुल्लाणी यांनी सूत्रसंचालन केले. सार्थक क्रिएशन्सच्या कलाकारांच्या नृत्याने रंगत आणली तर स्वराज्य ढोलपथकाने वातावरण निर्मिती केली.

‘नेताजी’चा आत्मविश्वास

पहिल्या फेरीत नेताजीला पाच थरही लावता आले नव्हते. परंतू त्यांनी जिद्द सोडली नाही. दुसऱ्या फेरीचा लकी ड्रॉ काढताना पहिलीची चिठ्ठी नेताजीची आली आणि प्रचंड आत्मविश्वास असलेल्या गोविदांनी नृत्यच करायला सुरूवात केली.

चढाईची वेळ सुरू झाल्यानंतर अतिशय आत्मविश्वासाने सरसर एक एक थर लावत नेताजीचे गोविंदा थर लावू लागले. टाळ्या वाजू लागल्या. श्वास रोखले गेले. कळसावर तिहेरी एक्का लागला.

सर्वात वरचे प्रकाश मोरे सहकाऱ्याच्या खांद्यावर उभे राहिले आणि डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच ९ वाजून ४१ मिनिटांनी हंडी फुटली आणि केवळ आणि केवळ जल्लोषाला सुरूवात झाली.

योग्य वेळी समाचार घेवू

धनंजय महाडिक म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाची मान जगभरात उंचावली आहे. आज चांगली वेळ आहे. गोकुळ, राजारामचं काहीकाही कानावर येतंय. ‘रस्सी जल गई लेकिन बल नही गया’. आम्ही महादेवराव महाडिक यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. योग्यवेळी समाचार घेवू.

अवघी तरूणाई रस्त्यावर

शहरात दहापेक्षा अधिक मोठ्या दहीहंडीमुळे अवघी तरूणाई रस्त्यावर उतरली होती. अनेक ठिकाणी कुटंबासह नागरिक दहीहंडीचा थरार पहावयास आले होते. त्यामुळे दसरा चौक, छत्रपती शिवाजी चौक, मिरजकर तिकटी, गुजरी, बालगोपाळ तालीम परिसर, पंत बावडेकर आखाडा शिवाजी पेठ या ठिकाणी गर्दी उसळली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here