आजारी आई वाट पाहत होती, इकडे काळजाचा तुकडा जग सोडून गेला

0
93

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

फुलंब्री : आजारी आईला भेटण्यासाठी तो पुण्याहून लगबगीने निघाला. मात्र, रस्त्यातच काळाने डाव साधला. एका भरधाव कारने त्याच्या दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. इकडे आपल्या काळजाच्या तुकड्याची वाट पाहत रस्त्याकडे नजर लावून बसलेल्या माउलीला त्याचे पार्थिव पाहण्याची वेळ आली.

हा अपघात जळगाव रस्त्यावर फरशी फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडला. समाधान विठ्ठल राऊत (वय ३२, रा. शिवना, ता. सिल्लोड) असे या घटनेतील मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याची आईसोबतची भेट अखेर अधुरीच राहिल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिवना येथील समाधान राऊत हा तरुण मागील काही वर्षांपासून पुणे येथे एका हॉटेलमध्ये कामाला होता. इकडे गावाकडे काही दिवसांपासून त्याची आई आजारी होती.

त्यामुळे सुट्टी काढून शुक्रवारी पहाटे तो आईला भेटायला आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच १४ जीएक्स ४४९७) निघाला होता. छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गाने सिल्लोडकडे जात असताना फरशी फाटा येथे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या भरधाव कारने (क्र. एमएच ०२ सीआर ३०२२) त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

यात समाधान गंभीर जखमी झाला. त्याला काही नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

इकडे मुलगा येणार असल्याने वाट पाहणाऱ्या आईसमोर त्याचा मृतदेह आल्याने त्या माउलीने हंबरडा फोडला. या घटनेची नोंद वडोदबाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास पोना. रवी देशमुख करीत आहेत.

दीड वर्षापूर्वीच झाले होते लग्न
समाधान राऊत हा पोटापाण्यासाठी पुणे येथे हॉटेलमध्ये नोकरी करीत होता. दीड वर्षापूर्वीच त्याचा विवाह झाला. त्याच्या अकाली जाण्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here