कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन चारशे रुपये दुसरा हप्ता द्यावा, या मागणीसाठी आज, बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
‘स्वाभिमानी’चे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ताराराणी पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक चारशे रुपये इतकी रक्कम दिवाळीपूर्वी मिळाली पाहिजे, अन्यथा साखर कारखान्यांची धुराडी पेटवू देणार नाही, असा इशारा दिला.
तसेच राज्य सरकार कोणत्याच बाबतीत गंभीर नाही.
शेतकऱ्यांच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे. राज्य सरकार बेजबाबदार काम करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
गतवर्षी जयसिंगपूर येथे ऊस परिषद झाली असता एफआरपी ताबडतोब १५ दिवसांत हंगाम संपल्यानंतर, प्रतिटन २०० रुपये आणि वर्षभरात साखरेचे दर पाहून उर्वरित रक्कम मिळावी, अशी मागणी केली होती.
त्यानुसारच आता आम्ही ही रक्कम मागत आहोत. ती दिली नाही तर आगामी ऊस गळीत हंगामात शेतकऱ्यांना संघर्षाची भूमिका घेणे भाग पडेल, असा इशाराही त्यांनी दिला