प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मनोज जरांगे म्हणाले, “सरकारला समाजाची दिशाभूल करणे अत्यंत महागात पडेल. इच्छा नसतानाही आम्ही राज्य शासनाला निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची विधान करू नये. मोकळं व्हायचं की काय? ते बघू. राज्य शासनाने मराठा समाजाला आणखीन वेठीस धरू नये.”
दरम्यान, मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं असं मुख्यमंत्री शिंदेंनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना म्हटलं आहे.
त्यानंतर अजित पवारांनी हो हो म्हणत एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर माईक चालू आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.या तिघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे.
या व्हिडिओवरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. “बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!” – घटनाबाह्य मुख्यमंत्री . ही ह्यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशिलता?
खरतर हीच ती गद्दार वृत्ती! गेलं १.५ वर्ष महाराष्ट्र ह्या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकून घेतंय. ह्या मिंधे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच पण देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का?
तुरुंगात जायचं नाही आणि मुख्यमंत्री पदावर बसायचं म्हणून ज्यांनी ह्यांना घडवलं, वाढवलं, पदं दिली, सत्ता दिली त्यांचे नाही होऊ शकले, तर हे महाराष्ट्राचे काय होणार?
दुर्दैव आहे आमच्या राज्याचं की गद्दारी करून हे असलं खोके-धोके सरकार महाराष्ट्रातल्या नागरिकांवर लादलं गेलंय!”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.