उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये द्या; कोल्हापुरात राजू शेट्टींची धडक, कारखानदारांना ‘धडकी’

0
62

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

पैसे देणार नसाल तर तुमच्या नरड्यावर (गळ्यावर) पाय देऊन कसे वसूल करायचे हे माहिती आहे. दसऱ्यापर्यंत साखर कारखानदारांनी चारशे रुपये द्यावेत, अन्यथा मुहूर्तावर पेटवलेल्या बॉयलरमध्ये संचालकांना फेकून देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन चारशे रुपये द्या, वजनकाटे डिजिटल करा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यामध्ये कोल्हापूर व सागंली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ताराराणी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली, शाहू मार्केट यार्ड येथे झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी साखर कारखानदार व राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढले.

शेट्टी म्हणाले, रंगराजन समितीच्या सूत्रानुसार शेतकऱ्यांना हिशोब दिला पाहिजे.

मात्र, गेल्या तीन वर्षांपासून कारखान्यांचा हिशोब करण्यास सरकारला वेळच नाही.

त्यामुळे, आता शेतकरी सांगतील तोच हिशोब, किती पोलिस आणायचे ते आणा, असे दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठणकावून सांगितले आहे.

जर, सोमेश्वर व मालेगाव साखर कारखाने ११.७० टक्के उताऱ्याला ३४११ रुपये देत असतील आमच्या १२.५० उताऱ्याला किती मिळाले पाहिजेत? केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या धोरणांमुळे हे शक्य झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगत असतील तर त्यांनी इतर कारखानदारांनाही ते पैसे देण्यास सांगावे.

प्रादेशिक साखर उपसंचालक गोपाळ मावळे यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूर विभागातील बहुतांशी कारखान्यांनी डिजिटल काटे बसवले आहेत, चार राहिले असून, त्यांनाही लवकर बसवण्याच्या सूचना केल्या जातील, अशी ग्वाही गोपाळ मावळे यांनी दिली.

‘स्वाभिमानी’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्याणवर, महेश खराडे, वैभव कांबळे, संदीप राजाेबा, अजित पोवार, जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर, जनार्दन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

मग, साखरेचा हिशोब जागतिक बाजारपेठेनुसार का नाही?

जागतिक बाजारपेठेत रासायनिक खतांच्या किमती वाढत असल्याने आणखी दर वाढतील असे कंपन्या सांगत आहेत. खतांचा दर जागतिक बाजारपेठेनुसार अवलंबून असेल तर साखरेला हा नियम का नाही, असा सवाल शेट्टी यांनी केला.

२ ऑक्टोबरपासून साखर वाहतूक बंद

कारखानदारांनी २ ऑक्टोबरपर्यंत चारशे रुपयांबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा कारखान्यातून साखरेचा एक कणही बाहेर सोडणार नाही. साखर वाहतूक करणाऱ्यांनी त्याच्या भानगडीत पडू नये, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

तरणाबांड मुलगा द्या, पुढचे मी बघतो

प्रत्येक कुटुंबातील २२-२३ वर्षांचा तरणाबांड एक मुलगा द्या, मग चारशे काय सहाशे रुपये कसे घ्यायचे ते मी बघतो. बापाला तोट्यात घालणाऱ्यांना मातीत कसे गाडायचे हे त्याला शिकवतो, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

आंदोलनाची पुढची दिशा

साखर आयुक्तांना भेटून चारशे रुपयांची मागणी करणार
मोटारसायकल रॅलीद्वारे प्रत्येक कारखान्यांना निवेदन
२ ऑक्टोबरला कारखान्यांवर ढोल-ताशा घेऊन कारखानदारांना जागे करा
त्यानंतर कारखान्यातून होणारी साखर वाहतूक बंद

पवार यांच्या पोस्टरवरून झटापट

‘स्वाभिमानी’च्या मोर्चात ‘दादा हे असंच ना..’ या आशयाचे पोस्टर झळकावले. हे पाहून पोलिसांनी ते काढून घेतले. या वेळी शेतकरी व पाेलिसांत थोडी झटापटी झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here