कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
सातारा : पुसेसावळी दि. १० सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात एका निरपराध व्यक्तीचा बळी गेला. अनेक लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुख्य सूत्रधार आरोपीस अटक करावी तसेच प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या विक्रम पावसकर यांना अटक करावी, अशी मागणी सर्वधर्मीय नागरिक तसेच सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
त्यावेळी निवेदन देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला होता.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूसेसावळी हल्ल्याची सर्वसमावेशक सत्यशोधन समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अल्पसंख्याक समाजाविषयी सतत द्वेषपूर्ण, प्रक्षोभक आणि गैरसमज निर्माण करणारी वक्तव्ये केल्याप्रकरणी विक्रम पावसकर यांना तातडीने अटक करण्यात यावी, हिंसाचारात बळी पडलेल्या निरपराध नवविवाहित तरुणाच्या कुटुंबास तातडीने रुपये 25 लाख नुकसानभरपाई मिळावी,
झालेले पंचनामे व जबाब दबावाच्या वातावरणात झालेले असल्याने सर्व फेरपंचनामे करावे, सर्व पीडितांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, मागील सहा महिन्यात जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट केल्याचे निमित्त होऊन हल्ला झालेल्या सर्व घटनांची पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एकत्रित चौकशी करून त्यामागच्या षड्यंत्राचा शोध घ्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.