कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
गडहिंग्लज (कोल्हापूर) : क्रशरच्या खणीत अंघोळ करताना बुडणाऱ्या मुलाला वाचविताना आईचा मुलासह पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सुजाता सिद्धाप्पा पाटील (वय ३२), मल्लिकार्जुन सिद्धाप्पा पाटील (१०, रा.
भडगाव, ता. गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावरच घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुजाता यांचे मूळ गाव कुरणी (ता. हुक्केरी) आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे आकस्मिक निधन झाले.
पतीच्या निधनानंतर त्या मल्लिकार्जुन आणि आदित्य या दोन मुलांसह माहेरी भडगाव येथील मूकनावरवाडी येथे राहत होत्या. मल्लिकार्जुन गावातील प्राथमिक शाळेत चौथीत तर आदित्य हा पाचवीत शिकत होता.
रविवारी दुपारी सुजाता जवळच अदलेल्या क्रशरच्या खणीत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मल्लिकार्जुनही सायकलीने खणीकडे गेला होता. अंघोळीसाठी तो खणीत उतरला; मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडू लागला.
मुलगा बुडत असल्याचे लक्षात येताच त्याला वाचवण्यासाठी पाण्यात गेल्या. मात्र, घाबरलेल्या मल्लिकार्जुनने त्यांना मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
सुजातासोबत गेलेली सहा वर्षांची भाची अनुष्का हिने धावत जाऊन घरच्यांना ही घटना सांगितली.
तातडीने नातेवाइकांनी खणीकडे धाव घेतली. त्यांनी दोघांना पाण्यातून बाहेर काढले. परंतु, पाण्यात गुदमरल्यामुळे दोघांची प्राणज्योत मालवली होती.
आदित्य झाला निराधार
पतीच्या निधनानंतर माहेरी आलेल्या सुजाता मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होत्या. वडिलांच्या निधनानंतर आईच्या छत्राखाली आदित्य व मल्लिकार्जुन वाढत होते.
परंतु, आई व लहान भावाच्या मृत्यूमुळे आदित्य निराधार झाला आहे.