सापावर पाय पडल्याची शंका, चिमुरड्या शाळकरी मुलाचा घाबरुन ताप आल्याने दुर्दैवी अंत

0
190

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वाकरेत शाळेतून घरी येत असताना सापावर पाय पडल्याच्या भीतीने आजारी पडून ताप मेंदूपर्यंत गेल्याने चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली.

अर्णव नवनाथ चौगले (वय 8 वर्षे) असे त्या चिमुरड्या मुलाचे नाव आहे. तो इंग्रजी माध्यमात दुसरीच्या वर्गात शिकत होता. केवळ सापावर पाय पडल्याच्या भीतीने लहान लेकराचा अशा पद्धतीने शेवट झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

रविवारी (17 सप्टेंबर) सायंकाळी ही घटना घडली.अर्णव चार दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत होता. यावेळी त्याचा सापावर पाय पडला होता. त्यामुळे घाबरलेल्या अर्णवने घरी आल्यानंतर आई वडिलांनी वाटेत झालेला प्रकार सांगितला.

आई वडिलांनी तातडीने पाहिले असता त्याच्या पायावर कोणत्याही प्रकारचा ओरखडा किंवा दात वगैरे नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांची मनातील काहूर दूर झाले होते.

मात्र, अर्णव सापावर पाय पडल्याच्या भीतीने प्रचंड घाबरुन गेला होता. परिणामी त्याला ताप भरला. ताप भरल्याने कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

मात्र, संर्पदंशाची कोणतीही लक्षणे दिसत नाही आणि तापही कमी येत नसल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चिमुरडा अर्णव अत्यवस्थ झाला. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच रविवारी सायंकाळी त्याचा दुर्दैवी अंत झाला.

एकाच गावात दोन सर्पदंशाच्या घटना
दरम्यान, वाकरे गावामध्येच गुरुवारी (14 सप्टेंबर) झेंडूची फुले तोडण्यासाठी शेतात गेल्यानंतर बाजीराव पांडूरंग लोंढे (वय 45 वर्षे) यांना सर्पदंश झाला होता.

यानंतर त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना रविवारीच त्यांचे निधन झाले.

त्यामुळे एकाच गावात दोन दुर्दैवी घटना झाल्याने शोककळा पसरली. लोंढे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.

बाजीराव लोंढे हे फुलांचा व्यवसाय करत असल्याने ते झेंडूची फुले तोडण्यासाठी गेले होते. यावेळी फुले तोडत असताना काहीतरी चावल्याचे लक्षात आले.

यावेळी त्यांनी एखादा कीडा चावला असेल, म्हणून दुर्लक्ष केले. मात्र, त्यांना सर्पदंश झाला होता. त्यांना एक दात लागला होता.

त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना सीपीआरमध्ये गुरुवारी सायंकाळी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच रविवारी त्याचा अत्यवस्थ होऊन त्यांचा मृत्यू झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here