कोकणात गणेश उत्सवासाठी मुंबईहून लोकांचे मोठ्या प्रमाणात आगमन -पारंपारिक गणेश उत्सवासाठी कोकण भूमी सज्ज

0
144

आंबा प्रतिनिधी – उज्वला लाड

महाराष्ट्राची कोकण किनार पट्टी ही सिंधुदुर्ग कुडाळ पासून ते रायगड ,मुंबई पर्यंत पसरलेली आहे. ही कोकण किनारपट्टी समुद्र ,नारळी , पोफळीच्या बागा ,गर्द झाडी, हिरवा डोंगर अशी नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे.

त्याचबरोबर ही कोकण भूमी अनेक धार्मिक परंपरांनी सुद्धा नटलेली आहे.

त्यापैकी कोकणातील गणेश उत्सव हा घरोघरी वाड्या वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. कोकणात प्रत्येक घरी गणपती असतात.

या गणरायाच्या उत्सवासाठी मुंबई व परगावी कामासाठी असलेले लोक आपापल्या कुटुंबासह आपापल्या मूळ गावी येत असतात.

एरवी शहरासारखा नसलेली ही खेडी या दिवसात मात्र सर्व स्थानिकांच्या आगमनाने चैतन्यमय होतात.


नोकरी धंद्यासाठी मुंबईत स्थायिक असलेले चाकरमानी आपल्या कुटुंबीयांसह आपापल्या स्थानिक गावी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे ,रेल्वे गाड्यांना तसेच बसेस ना वगैरे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे .

शांत स्तब्ध असणारे पाडे वाड्या मुला माणसांच्या गोंगाटाने भरून गेलेले आहे . कोकणात सार्वजनिक गणेश उत्सवापेक्षा लोक घरोघरी गणपती बसवून त्याची पूजाअर्चा करतात.

सकाळी व सायंकाळी वाड्या वरील लोक व तरुण मुले मुली आपल्या वाडीतील किंवा अळीतील सर्वांच्या घरी क्रमाने जाऊन गणपतीची आरती करतात.

रात्री भजन किर्तन असे विविध कार्यक्रम असतात.

त्यानिमित्ताने एकमेकांच्या घरी येणे जाणे होते , सर्वांशी बांधिलकी व आपुलकी राहते.

अशाप्रकारे मोठमोठ्या शहरात राहून सुद्धा आपली ग्रामीण संस्कृती टिकविण्यासाठी व त्याची पुढील पिढीला ओळख होण्यासाठी गणेश उत्सव हा महत्त्वाचा सण ठरतो.

आपल्या मूळ गावाशी जोडली गेलेली नाळ व परंपरा टिकविण्यासाठी कोकणचे लोक दरवर्षी आपापल्या गावी येतातच.

नैसर्गिक साधन संपत्ती बरोबर धार्मिक परंपरांचे जतन व संवर्धन करणारी कोकण भूमी ही विशेषच मानावी लागेल. या निमित्ताने सर्व मराठी बांधवांना व कोकणवासीयांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here