कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर: सकल मराठा समाजाच्या प्रश्नावर 19 सप्टेंबरपूर्वी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात दिले होते.
मात्र हे आश्वासन पुर्ण न झाल्याने पुन्हा मराठा समाज आक्रमक झाला आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मंत्री मुश्रीफ यांना मराठा समाजाची फसवणूक महागात पडेल असा इशारा सोमवारी दिला.
मराठा आरक्षणप्रश्नी सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभा दौऱ्या दरम्यान आंदोलनाची घोषणा केली होती.
दरम्यानच, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पवार यांच्या गाडीखाली उडी मारण्याचा इशाराही दिला होता.
मात्र पालकमंत्री दीपक केसरकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात मराठा समाजासोबत बैठक घेत 19 सप्टेंबर पूर्वी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय झाला नाही. यामुळे संतप्त झालेल्या संजय पवार यांनी मंत्री मुश्रीफांना इशाराच दिला.
पवार यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मुश्रीफसाहेब तुम्ही एका विशिष्ट समाजातले असून सुद्धा तुमचे समावेशक व सर्वाच्या प्रती कल्याणकारी धोरण पाहूनच आपल्याला कोल्हापुरातील अठरापगड जनतेने भरभरून प्रेम केलंय आणी आपल्यावर विश्वास ठेवला.
परंतु नेमकं आपण त्याच लोकांच्या कळपात गेल्याने कदाचित वेळ मारून न्यायची सवय आपल्याला त्या लोकांची लागली असावी असा समज आता आम्हाला झालेला आहे.
झाल वेळ गेली.. काळ गेला.. प्रचंड आर्थिक सुबत्तेचे दर्शन घडवणारा भला मोठा कार्यक्रमही झाला अन् आपल्याला सोयीस्कर आपल्याच शिष्टाईचा विसर पडला.
मुश्रीफसाहेब आपल्याकडून मराठा समाजाला ही अपेक्षा नव्हती. वस्तुतः मराठा समाजाच्या बाबतीत चालकाढू व वेळकाढू धोरण हे सातत्याने शासनाने अवलंबलेला आहे.
याची जाणीव आम्हाला आहे. आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसणाऱ्या आंदोलनकर्त्यावर अमानुष लाठीमार करणाऱ्या प्रशासनाला व महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना अद्दल घडवल्यानंतर जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर मराठा समाजाला आशा दिसत असल्या तरी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला छत्रपतींचा स्वाभिमानी मराठा शांत बसणार नाही.
आंदोलनाची सुरुवात आपल्या गाडीपासून होऊ नये..
आपणही कॅबिनेट मंत्री आहात, कोल्हापुरात नेहमी असता हे आपल्या नक्की ध्यानात असावं.. आणि या आंदोलनाची सुरुवात आपल्या गाडीपासून होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.
निव्वळ स्वार्थासाठी, वेळ टाळण्यासाठी व निव्वळ राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करणे हे सत्ताधारी राजकारणांनी सोडून द्यावं. अन्यथा पुन्हा एकदा मराठ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.
बौद्धिक बोलघेवडी चालबाजी चालणार नाही
मुश्रीफ साहेब तुमचीच काय कुणाचीच ही बौद्धिक बोलघेवडी चालबाजी चालणार नाही.. त्यावेळेला मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली असेल या परिस्थितीचा विचार करून मराठा समाजाबाबत आपण बोललेल्या सर्व गोष्टी तातडीने व त्वरित अवलंबनात आणाव्यात अन्यथा पुन्हा एकदा मराठा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.