कॉलेजच्या मित्राने मैत्रिणीला घातला १४ लाखांचा गंडा; चांगला परतावा देण्याचे आमिष

0
98

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

सातारा : कॉलेजमध्ये जुनी ओळख असललेल्या एका मित्राने मैत्रिणीला चांगल्या परताव्याच्या आमिषाने तब्बल १४ लाख २८ हजार ४०० रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले.

याप्रकरणी संबंधित मित्रावर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमर संभाजी साळुंखे (रा. अमरलक्ष्मी, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी २५ वर्षांची असून, ती सातारा शहरात राहते. काॅलेजमधील तिच्या ओळखीच्या जुन्या मित्राने एके दिवशी तिला फोन केला. बंगळुरुमध्ये एक कंपनी आहे.

या कंपनीत तू पैसे गुंतवलेस तर तुला चांगला परतावा मिळू शकतो, असे सांगितले. त्यानंतर तो तिला वारंवार फोन करून पैसे गुंतविण्यास सांगू लागला.

काॅलेजमध्ये असताना त्याची ओळख होती. त्यामुळे तिने त्याच्यावर भरवसा ठेवला. त्याच्या विविध अकाउंटमध्ये तसेच रोख स्वरूपात नोव्‍हेंबर २०२२ ते १ एप्रिल २०२३ या कालावधीत एकूण १४ लाख २८ हजार ४०० रुपयांची रोकड अमर साळुंखे याला तिने दिली.

त्यानंतर त्याला पैसे कुठे गुंतवलेस व त्याची कागदपत्रे दे, असे सांगितल्याने त्याने धमकी देण्यास सुरुवात केली. अश्लील मेसेज पाठवून तुझी बदनामी करेन तसेच नोकरी करत असलेल्या ठिकाणी तिच्या सहकारी लोकांना मेसेज पाठवत होता.

तसेच पीडित तरुणीचे गुगल अकाउंट हॅक करून तिची वैयक्तिक माहिती व फोटो त्याने घेतले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला अश्लील मेसेज पाठवून तिचा त्याने विनयभंग केला.

या प्रकारानंतर पीडित तरुणीने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक संदीप जगताप हे अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here