Kolhapur: रस्त्याच्या कामात आधी टक्केवारी, आता भागिदारीच; शिवसेना ठाकरे गटाचा गंभीर आरोप

0
50

कोल्हापूर : महानगरपालिकेत रस्त्यांच्या कामात आधी टक्केवारी होती, आता थेट भागीदारी झाल्याचा आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सोमवारी करण्यात आला.

ज्या कंत्राटदारांनी केलेले रस्ते दायित्व कालावधीत खराब झाले त्यांना ब्लॅकलिस्ट करुन यापुढे कामे देण्याचे बंद करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी दुपारी महानगरपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन शहरातील खराब रस्ते, दायित्व कालावधीत खराब झालेले रस्ते आणि नव्याने होऊ घातलेले रस्ते या अनुषंगाने चर्चा केली.

चर्चेदरम्यान हा आरोप करण्यात आला. यावेळी एक निवेदनही त्यांना देण्यात आले.

महापालिका निविदा प्रक्रिया ई-निविदा पध्दतीने राबविल्या जात असून देखील निव्वळ शासनाकडून मिळणारा निधी हा काही लोकप्रतिनिधींच्या व्यक्तिगत स्वार्थापोटी प्रशासनाला हाताला धरुन काही ठराविक कंत्राटदारांनाच कामे देण्याचा घाट घातला जातो, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ११५ कामांपैकी ६५ कामे ही ठराविक कंत्राटदारांना दिली आहेत.

परंतू याच कंत्राटदारांनी केलेल्या खराब रस्त्यांमुळे प्रशासनाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते, असे यावेळी सांगण्यात आले.

दायित्व कालावधीत खराब झालेल्या रस्त्याबाबत यापूर्वीच्या प्रशासकांनी कंत्राटदारांना नोटीसा बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

असे असूनही प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी सत्तर टक्के रक्कम कंत्राटदारांना देऊन शासनाच्या निधीवर डल्ला मारला असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले.

शिष्टमंडळात संजय पवार, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, राजू जाधव, राहुल माळी, धनाजी दळवी, धनाजी यादव, संजय जाधव,दिनेश साळोखे, राजेंद्र पाटील, गोविंदा वाघमारे, दत्ताजी टीपुगडे, शशिकांत बिडकर, स्मिता सावंत, प्रतिज्ञा उत्तुरे, विजया भंडारी, दिपाली शिंदे, कमलाकर जगदाळे, संतोष रेडेकर यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here