कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : मुंबई, पुणेहून कोल्हापूरकडे येणाऱ्या गणेशभक्तांच्या प्रचंड प्रतिसादामुळे एस.टी.च्या कोल्हापूर विभागाला रविवारी (दि.१७) एका दिवसात सुमारे एक कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले.
मात्र, अंतर्गत ग्रामीण भागातील फेऱ्यांवर मार बसल्याने स्थानिकांची त्रेधातिरपीट उडाली.
एस.टी.महामंडळाने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांकरीता ४००० बसेसची राज्यभरातील विविघ विभागातून सुविधा उपलब्ध केली होती.
त्यात कोल्हापूर विभागातील बारा आगारांमधून मुंबई, पुणेहून कोल्हापूरकडे येणाऱ्या गणेशभक्तांकरीता २२० विशेष बसेसच्या जादा फेऱ्या आयोजित करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, मुंबई ते गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना या मार्गाच्या रुंदीकरणामुळे अडथळे निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी असे चित्र या मार्गावर निर्माण झाले आहे. त्याचाच फटका पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या एस.टी.बसेसनाही बसला आहे.
पाच तासांचा प्रवास आठ तासांवर…
पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या एस.टी.बसेस खेड, शिवापूर टोल नाका, खंबाटकी घाट आणि कराड येथे सुरु असलेला उड्डानपूल या ठिकाणी प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने पाच तासांचा प्रवास आठ तासांवर गेला. याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
गणेश भक्तांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे कोल्हापूर विभागाला सुमारे एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. जादा बसेस वळविल्याने ग्रामीण प्रवाशांची गैरसोय झाली होती.
मात्र, आजपासून ही सेवा पुन्हा पुर्ववत केली आहे. – अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग