कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज सुर्योदयी सकाळी 6.25 वाजता श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त महाराजांचे प्रथम अवतार असल्याने या जन्मकाळास विशेष महत्व आहे. दत्त देवस्थानच्यावतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
दत्त मंदिरात आज पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा झाली. परंपरे प्रमाणे सुर्योदयी सकाळी 6.25 वा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. दिलीपशास्त्री उपाध्ये यांनी पुराण वाचन केले.
जन्मकाळ प्रसंगी भाविकांनी आकर्षक फुलांनी सजविलेल्या श्रींच्या चांदीच्या पाळण्यावर अबिर गुलाल व फुलांची मुक्तपणे उधळण केली. मानकरी मेघशाम पुजारी यानी श्रींची विधिवत पूजा केली.
ब्रम्हवृंदांनी पाळणा म्हटला आणि प्रार्थना केली. उपस्थित महिलांनी मोठ्या भक्तीने श्रींचा पाळणा जोजविला व मंगल आरतीने ओवाळले. यानंतर भक्तांना सुंठवडा वाटप करण्यात आले. श्री दत्त देव संस्थानच्या सहकार्याने प्रमोद पुजारी, मेघशाम पुजारी व परिवार यांनी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली होती.