मोरया.., कोल्हापुरात गणपती बाप्पाचे चैतन्यमय वातावरणात स्वागत, पारंपारिक वाद्यांचा दणदणाट

0
56

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : मंगलमूर्ती मोरया, एक, दोन, तीन, चार, गणपतीचा जयजयकार अशा जयघोषात आज, मंगळवारी घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. ढोल, ताशाच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत लहान-थोर, मुली, महिलांनी चैतन्यमयी वातावरणात बाप्पाचे स्वागत केले.

सकाळपासूनच घरगुती गणपती आणण्यासाठी कोल्हापुरातील कुंभार गल्ली, पापाची तिकटीचा परिसर गर्दीने भरून गेला आहे. गणपतीच्या आगमनासाठी शहरवासिय उत्साहाने सज्ज झाले आहेत.

आरास, नैवेद्य, पूजा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जात आहे. प्रमूख मार्ग, चौक गर्दीने ओसंडून वाहू लागले आहेत. गणेशाच्या स्वागतादरम्यान पारंपारिक वाद्याच्या दणदणाटाने सारा परिसर दुमदूमून गेला.

वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असली तरी गणेशोत्सवाच्या जल्लोषाने सारे शहर व्यापून गेले आहे.

दुचाकी, चारचाकी, रिक्षा, हातगाडे, रथ यातून वाजत गाजत गणेश आगमन होत होते. चप्पल लाईन, दत्त गल्ली, पापाची तिकटी येथे वाहतूक कोंडी झाली होती. शहरात सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक संथ गतीने सुरू होती.

रंकाळा टॉवर, गंगावेश, फुलेवाडी रिंगरोड येथेही वाहतूक संथ गतीने होती. संध्याकाळी मंडळाच्या गणरायाचे आगमन होणार असल्याने डॉल्बी, वाद्य, लेसर शोचा झगमगाट दिसून येणार आहे. पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here