जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे यावे -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

0
77

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण आहाराचे किट देण्यासाठी अधिकाधिक दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन करुन जिल्हा क्षयरोग मुक्त होण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डी-मार्ट फौंडेशनने ५३८ क्षयरुग्णांना दत्तक घेत ६ महिने पोषण आहार किट पुरवण्यात येणार आहे. यातील पाच किटचे वाटप जिल्हाधिकारी श्री.रेखावार व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात क्षयरुग्णांना करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेश गायकवाड, प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर, माजी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, डी-मार्ट फौंडेशनचे दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख महेश पवार, विभागीय व्यवस्थापक सहदेव पाटील, सहायक व्यवस्थापक लक्ष्मण यादव, शाखा व्यवस्थापक अजिंक्य थोरात, सहायक व्यवस्थापक अमित रोकडे आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी राहूल रेखावार म्हणाले, प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियान सध्या राबवण्यात येत असून याअंतर्गत दानशूर संस्था, उद्योग समुह, व्यक्ती यांनी क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन किमान सहा महिन्यासाठी दत्तक घेवून या अभियानात सहभाग नोंदवावा. डी मार्ट फौंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर असून याचा प्रत्यय कोविड- १९ साथरोग कालावधीत आला आहे.

या संस्थेने ५३८ क्षयरुग्णांना दत्तक घेत समाजासमोर आदर्श ठेवला आहे, असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी डी-मार्ट फौंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करुन स्वेच्छेने निक्षय मित्र बनण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन केले.


यावेळी महेश पवार व लक्ष्मण यादव यांनी डी मार्ट फौंडेशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. शहरातील पाच शाळातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक, खुर्च्या, स्टूल, इंटरनेट, प्रशिक्षक आदींसह संगणक लॅब व विविध विषयांवरील पुस्तकांसह ग्रंथालय उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.

क्षयरोगाचे निराकरण करण्यासाठी निक्षय मित्र होण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक जबाबदारी म्हणून ५३८ रुग्णांना डी-मार्ट फौंडेशनतर्फे पोषण आहार किट सहा महिन्यासाठी देत असल्याचे त्यांनी सांगितले. टी.बी. पूर्णपणे बरा होतो, कोणत्याही रुग्णाने पुरेसा पोषण आहार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

टी.बी च्या उपचार कालावधीत योग्य पोषण आहार मिळाला नाही तर रुग्णांना उपचार मिळूनही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत. त्यामुळे क्षयरुग्णांनी योग्य व पुरेसा पोषण आहार घेणे महत्वाचे आहे.

महाव्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फौंडेशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर युवराज सासवडे यांच्या प्रयत्नामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर क्षयरुग्णांना दत्तक घेण्याचा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती डॉ. उषादेवी कुंभार यांनी दिली.


डॉ.माधव ठाकुर यांनी प्रास्ताविकात प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाच्या उद्देशाबाबत माहिती दिली. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दीष्टपूर्तीसाठी टिबी मुक्त भारत अभियान राबवण्यात येत असल्याचे सांगून याचे कामकाजाबाबत माहिती दिली.


डॉ.पी.ए.पटेल यांनी आभार मानले. यावेळी वैद्यकीय अधिकारी, एच.एफ.डब्लू.टी.सी. डॉ.विनायक भोई, डॉ.पी.ए. पटेल, विनोद नायडू, एकनाथ पाटील, संजय पाटील, नानासो पाटील, कैलास चौगले व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here