कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
पिंपरी : चिखली जाधववाडी येथे गेल्या दोन दिवसात डेंग्यूसदृश्य आजाराने पाच आणि दहा वर्षीय अशा दोन चिमुकल्यांचा बळी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच डेंग्यूबाधितांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत असून सप्टेंबर महिन्यामध्ये ४० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.
शहरामध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढतच आहे. गेल्या तीन महिन्यांत १२८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यू आजाराची लागण होणार्या काही रुग्णांमध्ये प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात.
शहरात जुलै महिन्यात डेंग्यूचे ३६ बाधित रुग्ण आढळले. तर, ऑगस्ट महिन्यात ५२ बाधित रुग्ण आढळून आले. लहान मुले आणि तरुणांमध्ये सर्वाधिक डेंग्यूची लागण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डेंग्यूशिवाय चिकुनगुण्या तसेच हिवताप यांसारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भावही शहरात वाढत आहे.
जाधववाडी येथील पाच वर्षीय बालकाला डेंग्यूसदृश्य आजाराने पुण्यातील जहांगिर रूग्णालयात दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने त्याला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात दाखल केले होते.
मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच जाधववाडी येथीलच १० वर्षीय मुलाला डेंग्यूसदृश्य आजारामुळे ४ सप्टेंबर रोजी पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.