कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचे अपात्र प्रकरण, मराठा आरक्षण, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतील उमेदवार या विषयांवर ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भूमिका मांडली आहे.
रत्नागिरी लोकसभेतील मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू आणि इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असे सांगत त्यांना उमेदवारी मिळाल्यास आपण त्यांच्या प्रचारातही सहभाग होऊन त्यांना निवडून आणू, असं मोठे वक्तव्य रामदास कदमांनी केलं आहे.
त्यामुळे एकेकाळी रामदास कदम व उदय सामंत यांच्यात असलेले राजकीय वैमनस्य आता संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
रामदास कदम यांनीच किरण सामंत यांच्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र या सगळ्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हेच घेतील व तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल असंही त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात दीड वर्षांपूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत उदय सामंत यांनी तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्याबरोबर प्रचारात व एकंदर निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊन थेट रामदास कदम व आमदार योगेश कदम यांनाच आव्हान दिलं होतं.
इतकंच नव्हे तर दापोली व मंडणगड येथे झालेल्या प्रचार सभेतही सहभागी होत कदमांच्या राजकारणाला ब्रेक लावण्याची तयारी केली होती. रत्नागिरी जिल्ह्यात रामदास कदम व आमदार योगेश कदम यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शह कटशहाच्या राजकारणात अनिल परब यांच्याबरोबर उदय सामंत हेही सक्रिय होते.
त्यावेळी रामदास कदम, योगेश कदम यांना न जुमानता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दापोलीत त्यावेळी काहीशी बॅक फुटवर गेलेल्या राष्ट्रवादी बरोबर थेट युती केली व दापोली व मंडणगड नगरपंचायतीवर सत्ता मिळवली.
त्यानंतर राज्यात वर्षभरात दोन वेळा झालेल्या राजकीय भूकंपानंतर सगळी राजकीय समीकरणं बदलली, पण दापोलीमध्ये नगरपंचायतीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीचा गट हा आता अजितदादा यांच्याबरोबर असला तरी दापोलीत सत्तेत मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर सहभागी आहे.
बदललेल्या राजकारणात सामंत-कदम घरोबा
बदललेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार योगेश कदम व शिवसेना नेते रामदास कदम यांचा उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत पूर्वीचे वाद विसरून घरोबा झाला आहे.
त्यामुळे कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना भाजप व आता अजितदादांची राष्ट्रवादी हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी मोठी तयारी करत आहे. अशातच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती भाजपाकडूनही दावा करण्यात आला आहे.
भाजपा युवा नेते आमदार नितेश राणे यांनी आकडेवारीचे गणित सांगत रत्नागिरी लोकसभेच्या जागेवर भाजपाचा दावा असल्याचे म्हटले आहे.
नारायण राणे तुमचे जुने मित्र आहेत, सहकारी आहेत, त्यामुळे राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरती उमेदवारी मिळाल्यास तुमची भूमिका काय? या प्रश्नावरही रामदास कदम यांनी ‘जर-तर’ला अर्थ नसतो असे सांगत शिवसेना भाजप व राष्ट्रवादी आम्ही सत्तेत आहोत त्यामुळे तीन पक्षांचे नेते मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
“मुख्यमंत्रीबदल हे उद्धव यांचे दिवा स्वप्न”
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दिल्लीला गेले म्हणजेच मुख्यमंत्री बदलाचा विषय सुरू झाला असं होत नाही ते त्यांच्या कोर्टातील काम करता गेले असतील आणि मुख्यमंत्री बदलला हा विधानसभा अध्यक्षांचा विषय नसतो.
रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना अपात्रता प्रकरणावरून भाष्य करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे इतकंच नव्हे तर स्वतःचं मुख्यमंत्रीपद गेल्यापासून त्यांना कायम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद कधी जाईल याची दिवा स्वप्न पडत आहेत अशीही बोचरी टीका उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर कदम यांनी केली आहे.