देवेगौडा यांच्या भाजपशी हातमिळवणीला विरोध, महाराष्ट्र जनता दलाची भूमिका

0
70

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : एचडी कुमारस्वामी यांनी एचडी देवेगौडा यांच्या मान्यतेने दिल्ली येथे भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपाशी युती ही भूमिका महाराष्ट्रातील जनता दल सेक्युलर कार्यकर्त्यांना मान्य नाही. त्यामुळे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे जनता दलातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय व्यापक बैठक पुण्यात शनिवार (दि. ३० सप्टेंबर) होत आहे.

या बैठकीत पुढील भूमिका, धोरण व निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका बैठकीचे निमंत्रक प्रताप होगाडे, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डॉ. विलास सुरकर, साजिदा निहाल अहमद, मनवेल तुस्कानो, सलीम भाटी, ॲड. रेवण भोसले, ॲड. नंदेश अंबाडकर, युयुत्सु आर्ते, विठ्ठल सातव, प्रकाश लवेकर, दत्तात्रय पाकिरे यांनी जाहीर केली आहे.


समाजवादी व धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारे राज्यातील जनता दलातील सर्व राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, राज्य कार्यकारीणी सदस्य व निमंत्रित प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय व्यापक बैठक राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय, साने गुरुजी स्मारक, दांडेकर पूल येथे होत आहे. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्रातील बहुतांशी कार्यकर्ते राष्ट्र सेवा दल, समाजवादी पक्ष या विचारसरणीमधून आले आहेत. हे सर्व कार्यकर्ते धर्मनिरपेक्ष व विज्ञाननिष्ठ विचारधारेचे आहेत.

महाराष्ट्रातील आणि देशातील संविधान विरोधी, लोकशाही व जनहित विरोधी, मनुवादी फॅसिझमच्या पुरस्कर्त्या धर्मांध व जातीयवादी भाजप संघ प्रणीत राजकारणाचा, राज्य आणि केंद्र सरकारचा व अशा सर्व प्रवृत्तींचा विरोध करणे ही जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र पक्षाची व कार्यकर्त्यांची भूमिका प्रथमपासूनच होती, आजही तीच आहे आणि पुढेही तीच कायम राहील अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र जनता दलाचे जेष्ठ नेते व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रताप होगाडे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here